टाळेबंदी शिथीलकरणानंतर रेल्वे मालवाहतुकीमध्ये प्रचंड वाढ

0
421


1 ते 31 मे, 2020 मध्ये भारतीय रेल्वेकडून 82.27 दशलक्ष टन अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक; एप्रिलच्या तुलनेमध्ये 25 टक्के जास्त मालवाहतूक

1 एप्रिल 2020 ते 9 जून 2020 या काळामध्ये रेल्वेकडून एकूण 175.46 दशलक्ष टन अत्यावश्यक सामुग्रीची देशभरामध्ये वाहतूक

24 मार्च, 2020 ते 9 जून, 2020 या कालावधीमध्ये 31.90 लाख वाघिणींच्या मदतीने पुरवठा साखळी कार्यरत ठेवण्याचे कार्य;  यापैकी 17.81 लाख वाघिणींचा उपयोग जीवनावश्यक सामुग्रीची वाहतूक करण्यासाठी

22 मार्च, 2020 ते 9 जून, 2020 या काळात वैद्यकीय साहित्य, वैद्यकीय उपकरणे, अन्न या अत्यावश्यक वस्तूंसाठी भारतीय रेल्वेच्या 3,861 पार्सल गाड्या चालविण्यात आल्या

 

गोवा खबर:कोविड-19 महामारीचा संपूर्ण देशभर उद्रेक झाल्यामुळे सर्वत्र टाळेबंदी लागू करण्यात आली होती. या काळात भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक आणि पार्सल सेवांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम सुरू करण्यात आले, ते टाळेबंदी शिथिल केल्यानंतर अजूनही चालू आहे. ऊर्जा आणि पायाभूत क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या वस्तू आणि त्या वस्तूंचे वेळेवर वितरण सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वेने विशेष कोविड -19 संपूर्णपणे मालवाहतूक कॉरिडॉर सुरू ठेवले. यामुळे घरगुती क्षेत्राला आवश्यक असणारा माल त्याचबरोबर उद्योग क्षेत्रांची गरज पूर्ण करणारा अगदी वेळेवर योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्यात रेल्वेला यश आले.

भारतीय रेल्वे 1 मे 2020 ते 31 मे 2020 या काळात 82.27 दशलक्ष टन अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक केली आहे. ती आधीच्या महिन्यापेक्षा एप्रिल 2020 पेक्षा 25 टक्के जास्त आहे. रेल्वे खात्याने 1 एप्रिल 2020 ते 30 एप्रिल 2020 या काळात 65.14 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली होती.

रेल्वे खात्याने दि. 1 एप्रिल 2020 ते 9 जून 2020 या काळामध्ये रेल्वेकडून एकूण  175.46 दशलक्ष टन अत्यावश्यक सामुग्रीची देशभरामध्ये वाहतूक केली. या मालवाहू गाड्यांनी आठवड्यातले सर्व सातही दिवस- चोवीस तास देशभर धावून आणि देशातल्या कानाकोप-यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा, मालाचा पुरवठा केला.

24 मार्च 2020 ते 9 जून 2020 या कालावधीमध्ये 31.90 लाख वाघिणींच्या मदतीने संपूर्ण देशभर पुरवठा साखळी कार्यरत ठेवण्याचे कार्य करण्यात आले. यापैकी 17.81 लाख वाघिणींचा उपयोग अत्यावश्यक सामुग्रीची वाहतूक करण्यासाठी केला. यामध्ये अन्नधान्य, मीठ, साखर, दूध, खाद्यतेल, कांदा, फळे आणि भाज्या, पेट्रोलियम उत्पादने, कोळसा, खते इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. या सर्व वस्तू देशभरामध्ये पोहोचवण्यासाठी रेल्वे वाघिणींची मदत घेण्यात आली. 1 एप्रिल 2020 ते 9 जून 2020 या काळामध्ये रेल्वेच्यावतीने 12.56 दशलक्ष टन अन्नधान्याची वाहतूक करण्यात आली. याचकाळात गेल्या वर्षी (1एप्रिल 2019 ते 9 जून 2020) 6.7 दशलक्ष टन अन्नधान्याची वाहतूक करण्यात आली होती.

या व्यक्तिरिक्त रेल्वेने 22 मार्च 2020 ते 9 जून 2020 या काळामध्ये एकूण 3,861 पार्सल गाड्या सोडल्या. यापैकी 3,755 गाड्या या नियमित वेळात्रकाप्रमाणे सोडण्यात आल्या. एकूण 1,37,030 टन माल पार्सल गाडीने पाठवण्यात आला. यामध्ये अत्यावश्यक वस्तू म्हणजेच वैद्यकीय क्षेत्राला लागणारी सामुग्री, औषधे, अन्नधान्य तसेच इतर महत्वाच्या सामुग्रीची वाहतूक करण्यात आली. आता टाळेबंदी शिथिल केल्यानंतर लहान पार्सल पोहोचवणेही तितकेच महत्वाचे काम झाले आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने असे पार्सल वेळेवर पोहोचते करण्यासाठी स्वतंत्रपणे पार्सल व्हॅनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ई-कॉमर्स आणि राज्य सरकारसह इतर ग्राहकांसाठी निवडक मार्गांवर रेल्वेच्याने पार्सल विशेष गाड्या सोडण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळीमध्ये व्यत्यय येणार नाही.

विभागीय रेल्वेमार्फत कोणत्या मार्गांवर पार्सल विशेष गाड्यांची आवश्यकता आहे, ते मार्ग चिन्हीत करीत आहेत. सध्या या विशेष गाड्या 96 मार्गांवर सोडण्यात आल्या आहेत. चिन्हीत करण्यात आलेले मार्ग पुढील प्रमाणे आहेत –

1.   दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू आणि हैद्राबाद या देशातल्या मोठ्या शहरांमध्ये नियमित संपर्क यंत्रणा उपलब्ध असणार आहे.

2.   राज्यांच्या राजधानीची शहरे, महत्वाच्या शहरांमधून राज्याच्या सर्व भागामध्ये संपर्क मार्ग.

3.   देशाच्या ईशान्य भागासाठी संपर्क यंत्रण सुनिश्चित करण्यात येत आहे.

4.   ज्या भागातून दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांना मागणी आहे, अशा प्रदेशांचा ज्या भागातून (गुजरात, आंध्र प्रदेश) दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांचा पुरवठा होतो.

5.   इतर आवश्यक वस्तू (कृषीविषयक साधने, औषधे, वैद्यकीय उपकरणे इत्यादी) उत्पादित करून देशाच्या इतर भागात पोहोचवली जातात.

भारतीय रेल्वेचा कर्मचारी वर्ग देशभर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित व्हावा, कोणत्याही भागात कोणत्याही सामानाची टंचाई निर्माण होवू नये म्हणून 24/7 कार्यरत आहेत. सर्व इंजिनचालक, गार्ड अतिशय प्रभावी काम करीत आहेत. लोहमार्ग, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड उपकरणे, इंजिन, डबे, वाघिणी यांच्या देखभालीचे काम करणारे कर्मचारी मालवाहू गाड्या नियमित, सुलभतेने धावाव्यात म्हणून कार्यरत आहेत.

संपूर्ण देशभर मालवाहतूक करताना विभागीय रेल्वेला कोणत्याही अडचणी येवू नयेत म्हणून गृह मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाकडून रेल्वे अधिकारीवर्गाला आवश्यक ते सहकार्य केले जात आहे.