टाक्टाई चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा

0
162

गोवा खबर : आल्तिन पणजी येथील वन भवनात एमएचएचे संयुक्त सचिव आशुतोष अग्निहोत्री, आयएएस, यांच्या नेतृत्वाखालील आंतरमंत्रालयीन पथकाने आज टॉक्टाई या चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याकरिता सर्व संबंधित खात्यांची बैठक घेतली.

बैठकीस अर्थ मंत्रालयाचे उपसंचालक शलाका कुजूर, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे संचालक, आर. पी. सिंह आणि रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रांजल बुरागोहेन, ग्रामीण विकास मंत्रालयाचे साहाय्यक आयुक्त. आयुष पुनिया, ऊर्जा मंत्रालयाचे उपसंचालक जितेश श्रीवास आणि मत्स्योध्योग खात्याचे वैज्ञानिक, डॉ एच. डी. प्रदीप उपस्थित होते.

सुरवातीस महसूल खात्याचे सचिव, संजय कुमार, आय.ए.एस. यांनी समिती सदस्यांना गोव्यात टॉक्टाई चक्रीवादळामुळे झालेल्या परिणामाची माहिती दिली व नुकसानीचा आढावा घेतला. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देताना संजय कुमार यांनी या चक्रीवादळामुळे गोवा राज्यातील वीज, पाणी आणि दूरसंचार नेटवर्कचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले. चक्रीवादळाने तीन लोकांचा जीव घेतला असून राज्य सरकारतर्फे त्यांच्या कुटुंबियाना आर्थिक मदत देण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे सुमारे २००४ घरे / खासगी तसेच सरकारी इमारतींच्या मालमत्तांचे नुकसान झाले आहे. पिकाचेही बरेच नुकसान झाले आहे. कृषी अहवालाच्या आधारे नुकसान भरपाई देण्यात आल्याचे सचिवांनी यावेळी सांगितले.

महसूल सचिवांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अंदाजे १५३ कोटीच्या नुकसानीचा अहवाल तयार करुन एमएचएच्या आंतरमंत्रिय केंद्रीय पथकाच्या सदस्यांना सादर केला आहे अशी माहिती दिली.

तद्नंतर कृषी, मत्स्योध्योग, सार्वजनिक बांधकाम खाते, वीज खाते, जलस्त्रोत खाते, अग्निशमन व आपत्कालीन आणि माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या प्रतिनिधींनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली.

गोवा सरकारच्या सचिवांनीही एमएचए पथकाशी संवाद साधला.