गोवा खबर:टपाल खात्याच्या ‘रॅम्प ट्रान्सफर’ म्हणजेच जलद सेवा पोहचवण्यासाठी हवाई वाहतुकीच्या माध्यमातून पार्सल सेवेचे आज उदघाटन करण्यात आले. पोस्ट मास्तर जनरल डॉ एन विनोदकुमार यांच्या हस्ते पर्वरी येथील टपाल छाननी कार्यालयात या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी अधीक्षक रवीश बाबू यांची उपस्थिती होती.
टपाल खात्याने हवाई वाहतूक कंपन्यांशी करार केला आहे. या करारानूसार हवाई वाहतूक कंपन्या थेट विमानसेवा नसलेल्या ठिकाणीही इतर माध्यमातून टपाल सेवा जलदरित्या पुरवणार आहेत. देशातून निवडलेल्या 89 ठिकाणांमध्ये गोव्याचा समावेश आहे. मात्र, दाबोळी विमानतळावरुन बऱ्याचा शहरांसाठी थेट हवाई वाहतूक नसल्यामुळे टपाल सेवा पोहचवण्यास विलंब होत होता. नव्या ‘रॅम्प ट्रान्सफर’ पद्धतीमुळे देशातील कोणत्याही भागात तीन दिवसांत टपाल वा पार्सल पोहचेल, असे पोस्ट मास्तर जनरल डॉ विनोदकुमार म्हणाले.
सामान्य जनतेचा टपाल खात्यावरील विश्वास जलद सेवेमुळे आणखी वृद्धींगत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. टपाल खात्याला अजूनही 40 ते 42 टक्के महसूल टपाल आणि पार्सल या सेवांमधूनच मिळतो, असे ते म्हणाले. यामुळेच स्पीड पोस्ट दुसऱ्या दिवशी ग्राहकाच्या हाती पडेल, यावर टपाल विभागाचा भर आहे. तसेच राज्यात सहा टपाल कार्यालयांमध्ये ग्राहकांना पार्सलचे पॅकींग्ज उपलब्ध करुन देण्याची सुविधा सुरु करण्यात आली असल्याची माहिती डॉ विनोदकुमार यांनी दिली. टपाल खात्याच्या कामाचा आढावा केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान खात्याचे सचिव दर महिन्याला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेत असल्याचे ते म्हणाले.
टपाल अधीक्षक रवीश बाबू यांनी प्रास्ताविक केले. किशोर कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले तर के.बी. भोसले यांनी आभारप्रदर्शन केले.
Attachments area