ज्येष्‍ठ साहिति्यक पत्रकार अरुण साधू यांचे निधन

0
1024

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरुण साधू यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. मुंबईतील सायन रुग्‍णालयात त्यांनी पहाटे साडेचारच्या सुमारास अखेरचा श्‍वास घेतला. साधू यांना प्रकृती अस्‍वास्‍थ्यामुळे रविवारी सकाळी त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. साधू यांची यापूर्वी अँजिओप्लास्टी झाली असून, त्यांच्यावर हृदयविकारासंदर्भात उपचारही सुरू होते. ज्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची हृदयक्रिया बाधित झाली होती. त्यामुळे त्यांना ताबडतोब व्हेंटिलेटरचा आधार द्यावा लागला, अशी माहिती सायन रुग्णालयाच्या अधिष्ठात्या जयश्री मोंडकर यांनी दिली. अरुण साधू हे सहा वर्षे पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते. त्यांनी केसरी, माणूस, इंडियन एक्स्प्रेस अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून पत्रकारिता केली होती. ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान व अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.