ज्येष्ठ फ्रेंच अभिनेत्री ईझाबेल हुप्पर्ट यांना इफ्फी 2019 जीवनगौरव पुरस्कार जाहीर

0
571

इफ्फीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात 50 चित्रपट दिग्दर्शिकांचे 50 चित्रपट दाखवले जाणार : प्रकाश जावडेकर

गोवा खबर:आंतरराष्ट्रीय चित्रपट सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध फ्रेंच अभिनेत्री इझाबेल अन मेडेलिन हुप्पर्ट यांना इफ्फी म्हणजेच आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 2019 चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत ही घोषणा केली. “इफ़्फ़ीचा जीवनगौरव पुरस्कार फ्रेंच अभिनेत्री इझाबेल हुप्पर्ट यांना जाहीर करतांना मला विशेष आनंद होत आहे.” असे जावडेकर यांनी म्हंटले आहे.

या सुवर्णमहोत्सवी वर्षात 50 दिग्दर्शिकांचे 50 चित्रपट, चित्रपट-सोहळ्यादरम्यान दाखवले जातील, असेही जावडेकर यांनी सांगितले.

इफ्फीमध्ये दाखवल्या जाणाऱ्या 200 चित्रपटांपैकी 24 चित्रपट सध्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत आहेत, अशी माहिती जावडेकर यांनी दिली.

इफ्फीमध्ये दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार हा सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. दहा लाख रुपये रोख असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. चित्रपटसृष्टीला दिलेल्या अतुल्य योगदानाबद्दल आणि त्यांच्या अभिनयकौशल्याचा सन्मान करण्यासाठी हुप्पर्ट यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

1971 पासून सुरु झालेल्या कारकीर्दीत हुप्पर्ट यांनी 120 चित्रपटात काम केले. आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील मानाचा पुरस्कार, ‘सीझर अवार्ड’साठी त्यांना 16 वेळा नामांकने मिळाली आहेत. तर दोनदा त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. एली या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना “गोल्डन ग्लोब” हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या या भूमिकेला जागतिक सिनेसृष्टीत मोठी लोकप्रियता आणि मानसन्मान मिळाला.

इझाबेल हुप्पर्ट या नाट्यकलावंत म्हणूनही प्रसिध्द असून नाटकातील त्यांच्या भूमिकांसाठी देखील त्यांचा गौरव करण्यात आला आहे. 62 व्या कान चित्रपट महोत्सवात त्या ज्युरी मंडळाच्या अध्यक्षही होत्या. कान चित्रपट महोत्सवात त्यांनी दोनदा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही जिंकला आहे.

त्याशिवाय विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांना अनेक पुरस्कार आणि नामांकने देखील मिळाली आहेत.