ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य सुलभ करणे हे पवित्र कार्य: थावरचंद गेहेलोत

0
1041

 

गोवा:केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्री थावरचंद गेहेलोत यांच्या हस्ते आज दक्षिण गोव्यातील दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना पूरक शारीरिक साहित्य (Physical Aids and Assisted Living Devices) वितरीत करण्यात आले. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय वयोश्री योजने’अंतर्गत दक्षिण गोव्यातील एक हजार चारशे सात वयोवृद्धांना हे साहित्य देण्यात आले. मडगाव मधील रवींद्र भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात चष्मा, दाताची कवळी, चालताना आधारासाठी आधुनिक काठी (ट्रायपॉड), चाकाची खुर्ची तसेच श्रवणयंत्र इत्यादी साहित्य प्रत्यक्ष लाभार्थींच्या हाती सोपविण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, विशेष अतिथी म्हणून गोवा राज्याचे सामाज कल्याण व ऊर्जा मंत्री पांडुरंग मडकईकर, दक्षिण गोव्याचे लोकसभा सदस्य नरेंद्र सावईकर तसेच दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी अंजली शेरावत उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या केंद्रीय मंत्री थावरचंद गेहेलोत यांनी आपल्या भाषणात वयोश्री योजनेचा उद्देश स्पष्ट केला. ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ ज्येष्ठ नागरिकांच्या सशक्तीकरणासाठी पूरक साहित्य उपलब्ध करून देते. या योजनेद्वारे देशभरात आजपर्यंत सुमारे 30 हजार वयोवृद्धांना असे साहित्य देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शक सूचनेचे पालन करताना दुर्बल, दिव्यांग, अनुसूचित अशा सर्वांना सबल करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत व या संदर्भात गेल्या साडेतीन वर्षात सुमारे 5 हजार 890 शिबिरांचे आयोजन मंत्रालयातर्फे करण्यात आले असल्याचे गेहेलोत यांनी यावेळी सांगितले.

याशिवाय 5-6 वर्षांखालील कर्णबधीर मुलांवर शस्त्रक्रिया करून त्यांना ऐकण्यास व बोलण्यास सक्षम करण्याचे कार्य देखील केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने हाती घेतले आहे. याअंतर्गत आजपर्यंत देशातील सुमारे 1000 मुलामुलींवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या एका शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे सहा लाख रुपये इतका होतो. या उपक्रमामुळे हजारपैकी नऊशेहून अधिक मुले ऐकू व बोलू लागली आहेत. यामध्ये गोव्यातील तीन मुलांचा देखील समावेश असून नोव्हेंबर 2017 मध्येच त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे, अशी माहिती गेहेलोत यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेहेलोत यांनी उपस्थितांना आपल्या परिचयातील 5 ते 6 वर्षाखालील कर्णबधीर मुलांना या उपक्रमाचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाशी संपर्क करण्याचे आवाहनही केले.