ज्युनियर गावडे देखील आज साकारणार संभाजी राजे

0
728
गोवा खबर:गोविंद गावडे यांच्या रूपाने कला आणि संस्कृती खात्याला कलेची जाण असलेला कलाकार मंत्री लाभला आहे.मंत्री म्हणून त्यांनी आपल्याला सिद्ध करण्याबरोबर आपण कसलेला कलाकार आहे हे त्यांनी इथे ओशाळला मृत्यू मधील संभाजी राजांची भूमिका करून गोवा आणि महाराष्ट्रा मधील जनतेला दाखवून दिले आहे.गावडे यांनी साकारलेली संभाजी राजांची भूमिका बरीच गाजत आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा वैश्रव हा आज शिवजयंतीला संभाजी राजांची भूमिका करून वडीलांचा कित्ता गिरवणार आहे.
नुकत्याच कुडका येथे पार पडलेल्या 9 व्या जागोर महोत्सवाच्या उद्धाटन सोहळ्यावेळी चौथीत शिकत असलेल्या वैश्रवने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या समोर एका जागोर मेळात बाबी कुंभाराची भूमिका सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली होती.
कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,आमच्या घरात सगळी मंडळी कलासक्त आहेत.वैश्रव लहानपणा पासून जागोर आणि इतर पारंपरिक लोककला बघत आलेला आहे.त्यातूनच त्याला आवड निर्माण झाली.आम्ही देखील त्याची कदर करत त्याला त्याचा छंद जोपासण्यास मोकळा हात दिला.त्याने देखील जागोर बघून बघून त्यातील बारकावे शिकुन घेतले.
वयाच्या सहाव्या वर्षा पासून वैश्रव जागोर मध्ये भूमिका करत आहे.वैश्रव हा बाबी कुंभार आणि शावूले भूराढे अशी पात्र जागोर मधून रंगवत असतो.आता आपल्या बाबांची संभाजी राजांची भूमिका बघून त्याने देखील संभाजी राजांची भूमिका रंगवण्याचे ठरवले आहे.
शिवजयंती निमित्त मडकई येथील विमलानंद कला मंच निर्मित वसंत कानेटकर लिखित आणि वरद कामत दिग्दर्शित गरुडझेप या ऐतिहासिक नाटकात वैश्रव हा चक्क संभाजी राजांची भूमिका साकारणार आहे.त्याच्या रंगीत तालमी उत्तम झाल्या असून अर्थातच त्याला सीनियर गावडे अर्थात बाबांचे मार्गदर्शन मिळत आहे.त्यामुळे आजच्या शिवजयंती सोहळ्यात ज्युनियर गावडे संभाजी राजे होऊन रंगमंचावर आपली छाप सोडणार असून त्याची पाठ थोपटायला सीनियर गावडे हजर असणार आहेत.19 फेब्रूवारी रोजी फर्मागुढी येथे नाटकाचा पहिला प्रयोग असून त्यानंतर साखळी,कुडचडे आणि धारबांदोडा येथे नाटकाचे प्रयोग होणार आहेत.
 एक क्लासक्त मंत्री आपल्या खात्याला अपेक्षित असलेले काम आपल्या घरातून करताना पहायला मिळणार आहे.