ज्यांना स्वतंत्र चित्रपट निर्मिती करायची आहे त्यांनी सरकारी निधीपासून दूर रहावे:महनाझ मोहम्मदी

0
555

इफ्फीमध्ये अंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी मांडले आपले अनुभव

गोवा खबर:ज्यांना स्वतंत्र चित्रपट निर्मिती करायची आहे त्यांनी सरकारी निधीपासून दूर रहावे, असे मत ‘सन मदर’ या इराणी चित्रपटाच्या दिग्दर्शक महनाझ मोहम्मदी यांनी व्यक्त केला आहे. गोव्यातील पणजी येथे आयोजित 50व्या इफ्फी महोत्सवात त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या परिषदेत ‘आय एम गोन्ना टेल गॉड एव्हरिथिंग’ या चित्रपटाचे दिग्दर्शक डेव पिन्न, ‘द अदर हाफ’ चित्रपटाचे निर्माते ॲल्यू डेनिए सुबोधी थेरो आणि ‘द फोर्थ वॉल’ चित्रपटाचे दिग्दर्शक झँग चाँग उपस्थित होते.

 

सिरीयामध्ये 2011 ते 2018 दरम्यान घडलेल्या सत्य घटनांवर आधारीत आपला चित्रपट असल्याचे डेव पिन्न यांनी सांगितले. आगामी काळात अमेरिकेतील गन कल्चरवर चित्रपट करण्याचा आपला विचार असल्याचे ते म्हणाले. कला आणि चित्रपट यांचा उपयोग मानवी जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी आणि मानवी मूल्ये वृद्धींगत करण्यासाठी होऊ शकतो, असे मत सुबोधी यांनी व्यक्त केले.  भारतीय चित्रपट चीनमध्ये अत्यंत लोकप्रिय असल्याचे ‘झँग चाँग’ यांनी यावेळी सांगितले. भारतीय अभिनेते अमीर खान यांचे अनेक चाहते चीनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

‘सन मदर’ चित्रपटाचा सारांश :

इराणमधल्या लैला नावाच्या एका विधवेची कहाणी या चित्रपटात आहे.

‘आय एम गोन्ना टेल गॉड एव्हरिथिंग’ चित्रपटाचा सारांश :

सिरीयामध्ये 2011 ते 2018 या कालावधीतील यादवीत घडलेल्या सत्य घटनांवर हा चित्रपट आहे. सामाजिक कार्यकर्ता अनिस सिरीयातील क्रौर्याची माहिती जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यातच तो सरकारचे लक्ष्य ठरतो. अनिस आपल्या प्रयत्नात यशस्वी होतो का हे या चित्रपटात पहायला मिळेल.

‘द अदर हाफ’ चित्रपटाचा सारांश :

श्रीलंकेतल्या एका गावात राहणाऱ्या कुटुंबाला शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे विषबाधा होते. त्यात रुवांसिरी नावाच्या मुलाच्या वडीलांचा मृत्यू होतो त्यानंतर त्याच्या संघर्षाची ही कहाणी आहे. शिक्षण व्यवस्थेवरही या चित्रपटात भाष्य आहे.

‘द फोर्थ वॉल’ चित्रपटाचा सारांश

ली लू ही नायिका आणि मा है यांच्यातली एकतर्फी प्रेम कहाणी या चित्रपटात दाखवली आहे. हरीण संगोपन केंद्रात काम करणारी ली लू माणसांच्या प्रेमापासून पारखी असते. मात्र मा है तिला एका नव्या जगात घेऊन जातो. फँटसीच्या माध्यमातून दिग्दर्शकाने हा प्रवास उलगडला आहे.