जोरदार पावसाच्या सोबतीने गोव्यात सांजाव उत्साहात साजरा

0
1221

गोवा खबर:पारंपरिक बँड, डीजेची साथ आणि जोरदार पावसाच्या हजेरीमुळे ख्रिश्चन बांधवांच्या सांजाव उत्सवाचा माहौलच बदलून टाकला.राज्यभरात ख्रिश्चन बांधवांनी पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने आज सांजाव साजरा केला.
संत जॉन बाप्तिस्ता अर्थात जुवांव बाप्तिस्ता यांचा जन्मदिवस गोव्यात सांजावच्या रूपाने साजरा केला जातो.सांजावच्या वेळी पाऊस नसेल तर हिरमोड होऊ नये यासाठी कृत्रिम पावसाची व्यवस्था शहरी भागात केली जाते मात्र यंदा पावसानेही सांजावसाठी हजेरी लावल्याने ख्रिश्चन बांधवांचा आंनद द्विगुणित झाला होता.ग्रामीण भागात विहीरींमध्ये तर शहरी भागात कृत्रिम तळे करून त्यात डुबकी मारून हा उत्सव साजरा केला जातो..
काय आहे सांजावची परंपरा
 
मान्सून सुरू झाल्यावर राज्यभरातील ख्रिस्ती बांधवांना वेध लागतात ते 24 जूनच्या सांजावचे.! डोक्यावर काटेरी मुकुट, गळ्यात घुमट व फुलांच्या माळा, हातात माडाचे पिडे (फांदी), व अन्य वाद्ये वाजवित-नाचत-गात लोक गटागटाने फिरतात. राज्यातील विहिरी, तलावात उड्या मारून मौजमस्ती करतात. डोक्यावर गोलाकार आकाराची चक्रे सजवतात. त्यांना कॉपेल म्हणतात. कॉपेल फुलांनी सजवतात. वातावरण आनंदी असते. या आनंदात दिवस कधी संपतो ते कळत नाहीत. निसर्गाला जपण्याचा संदेशही सांजावद्वारे दिला जातो. या दिवशी सासरवाडीला येणा:या जावयाचा मोठा सन्मान केला जातो
मान्सूनच्या आगमनाबरोबरच गोव्याच्या हवेत सांजावचे रंग भरु लागतात. नवविवाहित जोडप्यांना पानाफुलांचा काटेरी मुकूट घालून वैवाहिक आयुष्याच्या शुभकामनेसाठी गावच्या विहिरीत डुबकी मारायला लावली जाते. ही सांजावची मूळ संकल्पना. सांजावच्या परंपरेत नव्या पिढीचा उत्साहही जोडला जातो आहे. शिवोली येथे सांजावच्या निमित्ताने भव्यदिव्य कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळाली. एकीकडे अवीट कोकणी गीतांचा ताल, दुसरीकडे रंगीबेरंगी पोशाखात डोक्यावर पानाफुलांचे काटेरी मुकूट मिरवत विहिरित डुबकी मारण्याची रंगत आणि सजलेल्या होड्यांच्या भव्य स्पर्धांनी यावर्षीच्या सांजावमधेही अनोखी रंगत भरली. सांजावच्या या जल्लोषात स्थानिकांच्या जोडीला पर्यटकही सहभाग नोंदवत आनंद लुटल्याने महोत्सव अधिकच रंगतदार झाला.