जेएनयूच्या विद्यार्थी व अध्यापकांवरील हल्ला निंदनीय: आप

0
905
गोवा खबर:बुरखाधारी हल्लेखोरांनी जेएनयूच्या विद्यार्थी व अध्यपकांवरील केलेला हल्ला हा अत्यंत निदनीय आहे, असे मत गोवा आम आदमी पक्षाचे निमंत्रक एल्विस गोम्स यांनी व्यक्त केले. दिल्लीत भाजपाने आपली लोकप्रियता गमावली असल्याने कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा हा एक डाव आहे, असे आम आदमीने पुढे म्हटले आहे.
विद्यार्थी हे देशाचे भविष्य असतात त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करणे म्हणजे देशाच्या भवितव्यावर हल्ला करणे होय, असे मत  गोम्स यांनी व्यक्त केले आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर होत असताना असले भ्याड हल्ले करणे निंदनीय आहे. विशेष म्हणजे या बुरखाधारी गुंडांना जेएनयू आवारात येऊ देणे, त्यांनी हिंसा चालू केल्यावर निव्वळ बघ्याची भुमिका घेणे व त्यानंतर त्यांना तेथून पलायन करू देणे, ही पोलिसांची कृती या षडयंत्राचा भाग आहे,असा आरोप देखील गोम्स यांनी केला.
 विद्यार्थ्यांना लक्ष्य करणे, हा काय वेडेपणा आहे? सर्व काही अंधारातच घडते. वीज घालवली जाते, तोंडावर बुरखे घातले जातात, काठ्या, हातोडे व इतकेच नव्हे तर ॲसिडचा वापर करून वसतीगृहांवर हल्ला केला जातो आणि विद्यार्थी व शिक्षकांना बेदम मारहाण केली जाते, याकडे लक्ष वेधुन गोम्स म्हणाले, आशा आहे की सर्वोच्च न्यायालय या भ्याड हल्ल्याकडे काटेकोरपणाने बघेल व या नियोजनातील सर्वांना कडक शासन करेल.
आता भाजपात जाऊन मंत्रीपदे भोगत असलेल्या पूर्वी निष्ठावंत असलेल्या काँग्रेस आमदारांकडे लक्ष वेधताना गोम्स म्हणाले , शांतताप्रिय गोमंतकियांना विभागण्यास हेच आमदार जबाबदार आहेत. त्याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल.
आम आदमी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रदिप पाडगावकर यांनी भाजपावर टीका करताना “जगा व जगवा” हा मंत्र भाजपाला मान्य नाही, असेच यातून दिसते.  या पृथ्वीवर आपले अस्तित्व राखण्यासाठी मानव जीवन साखळीतील प्रत्येकावर अवलंबून असतो. मग मूलभूत हक्कांसाठी झगडणाऱ्या काही घटकांविरुद्ध भाजपा का वावरतो असा सवाल त्यांनी केला.
 गुंडांचा वापर करून मारहाण केल्याने भविष्यातील नागरिक कसे तयार होणार असा प्रश्र्न उपस्थित करून ते पुढे म्हणाले, भाजपास दिल्लीत निवडणुका घ्यायच्या नसाव्यात. त्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्याचा हा एक डाव आहे.