जुने गोवे येथील गोयच्या सायबाचे आज फेस्त

0
809
गोवा खबर: जुने गोवे येथील प्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उद्या सोमवारपासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरे केले जाणार आहे.   मुंबईचे बिशप फादर बार्थाेल बार्रेटो सोमवारी सकाळी १0.३0 वाजता मुख्य प्रार्थनेच्यावेळी भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत. गोवा, दमण दिवचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव हेही यावेळी उपस्थित असणार असून भाविकांच्या गर्दीने जुने गोवे परिसर गजबजुन गेला आहे.
 
 सोमवारी पहाटे ४ वाजल्यापासून प्रार्थना सुरू होतील. सकाळी 9 वाजेपर्यंत तासातासाने प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १0.३0 वाजता मुख्य प्रार्थना होणार आहे. मुख्य प्रार्थना सभेला मंत्री, आमदार व इतर महनीय उपस्थित राहणार आहेत. या फेस्तनिमित्त  २४ नोव्हेंबर पासून ‘नोव्हेना’ (प्रार्थना) सुरु झाल्या आहेत. ‘नोव्हेना’  नऊ दिवस चालतात. लाखो भाविक  या  काळात हजेरी लावतील असा विश्वास  बासिलिका चर्चचे फादर पेट्रीसियो फर्नांडिस यांनी व्यक्त केला आहे.
शेजारी महाराष्ट्र तसेच  कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाविक या फेस्ताला येतात. कोल्हापूर, आजरा, गडहिंग्लज, नेसर्गी, मधवाल, देसनूर भागातील भाविक चालत  गोव्यात येतात. त्यांच्यासाठी मराठी, कन्नड तसेच विदेशी भाविकांसाठी स्पॅनिश व फ्रेंच भाषेतूनही प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चच्या आवारात तीन भव्य व्यासपीठे तयार केली आहेत. एलईडी आणि भव्य स्क्रीन्सची व्यवस्था आहे.  फादर पेट्रीसियो यांनी यंदा फेस्तात प्लाास्टिकचा कमीत कमी वापर यावर भर देण्यात आला असल्याचे स्पष्ट केले.
या चर्चचे वैशिष्ट्य म्हणजे युनेस्कोने जाहीर केलेले हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. ‘गोंयचो सायब’ म्हणून ओळखल्या जाणा-या सेंट फ्रान्सि झेवियरचे ४00 वर्षांपूर्वीचे पार्थिव येथे जतन करुन ठेवले असून ते जशाचे ते अद्याप जसेच्या तसे असल्याची भाविकांची भावना आहे. दर दहा वर्षानी हे पार्थिव भाविकांसाठी प्रदर्शनासाठी खुले केले जाते. २0१४ साली प्रदर्शन झाले आता दहा वर्षांनी म्हणजेच २0२४ साली पुन: प्रदर्शनासाठी ठेवले जाईल.  फेस्तानिमित्त जुने गोवे भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला असून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.