जुने गोवे पोलिसांनी आवळल्या दोन खंडणीबहाद्दरांच्या मुसक्या

0
635
गोवा खबर:जुने गोवे पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रामधील गुंडगिरी मोडीत काढत आज दोन खंडणीबहाद्दरांच्या मुसक्या आवळल्या.एका भंगार अड्डेवाल्याकडून प्रोटेक्शन मनी उकळत असल्या प्रकरणी जुने गोवे पोलिसांनी तक्रार दाखल झाल्या नंतर दोन तासांच्या आत ही कारवाई केली.
जुने गोवेचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहिती नुसार मेरशी येथे भंगार अड्डा चालवत असलेल्या विनोद वाघमोडे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार ही कारवाई करण्यात आली.वाघमोडे हे काल 21 जुलै रोजी हे घरी परतत असताना जवळच्या एका रेस्टॉरंट पाशी सूरज शेट्ये आणि विशाल गोलतकर यांनी वाघमोडे यांना चाकूचा धाक दाखवत धमकावून 50 हजार रुपयांची खंडणी प्रोटेक्शन मनी म्हणून मागितले.
याच दोघांना वाघमोडे यांनी जीवाच्या भीतीने मे महिन्यात 15 हजार रुपये खंडणी दिली होती.
कालच्या धमकी प्रकरणा नंतर वाघमोडे यांनी जुने गोवे पोलिसात धाव घेऊन पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या समोर कैफियत मांडली.दळवी यांनी वाघमोडे यांना विश्वासात घेऊन तक्रार नोंदवून घेत धडक कारवाई केली.
तक्रार नोंदवल्या नंतर तासा भरात जुने गोवे पोलिसांच्या पथकाने दोन्ही संशयितांच्या घरांवर धाड टाकून दोघांच्या मुसक्या आवळल्या.
सूरज आणि विशाल हे दोघे अट्टल गुन्हेगार आहेत.सूरजच्या विरोधात 5 गुन्हे नोंद आहेत तर विशालच्या विरोधात 6 गुन्हे नोंद आहेत.पोलिसांनी गुह्यासाठी वापरलेला चाकू संशयितांकडून जप्त केला आहे.
या दोन्ही संशयितांनी आणखी कोणास त्रास दिला असल्यास त्यांनी न भीता पुढे येऊन तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी केले आहे.