जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपची आघाडी;सांकवाळ मधून थोरात बिनविरोध

0
611

गोवा खबर:22 मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये भाजपने आघाडी घेत आज आपले खाते खोलले. दक्षिण गोव्यातील सांकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार अॅड.अनिता थोरात बिनविरोध निवडून आल्या आहेत.

उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपची पूर्ण बहुमताने सत्ता येणार असून त्याची सुरुवात आज सांकवाळ मतदारसंघातून झाली आहे,अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केली आहे.
तानावडे यांनी थोरात यांचे अभिनंदन करतानाच भाजपचे कार्यकर्ते सर्व ताकद पणाला लावून दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकवतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
भाजपच्या महिला आघाडी मोर्चाने देखील सांकवळ मतदारसंघातून बिनविरोध निवडून आल्या बद्दल थोरात यांचे अभिनंदन केले आहे.

भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सुलक्षणा सावंत म्हणाल्या,जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जनतेने भाजपवर विश्वास दाखवत दिलेली अनोखी भेट आहे.महिलांच्या सशक्तिकरणासाठी भाजप नेहमी कटीबद्ध आहे.केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना आणि उपक्रम राबवून महिलाना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे.थोरात यांच्यावर दाखवलेला विश्वास हा भाजपच्या धोरणांवर दाखवलेला विश्वास आहे.दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल आणि सर्व महिला उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यात शंका नाही.