जिल्हा पंचायत निवडणुकीत जनतेची भाजपला साथ;विरोधकांकडे पाठ:तानावडे

0
291
गोवा खबर:राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून भाजप सरकारने राज्यात केलेली कामे जनतेच्या पसंतीस उतरली आहेत.लोकांचा भाजप वरील विश्वास वाढत असून दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा पंचायत निवडणूक प्रचारास मिळत असलेल्या प्रतिसादाची माहिती देण्यासाठी भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तानावडे बोलत होते.यावेळी प्रदेश सरचिटणीस नरेंद्र सावईकर आणि अनिल होबळे उपस्थित होते.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सर्व मंत्री,आमदार,पदाधिकारी आणि कार्यकर्ते कडक उन्हाळा असून देखील जोरदार प्रचार करत आहेत.भाजपने प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या असून जनता भाजपच्या बाजूने आहे,असा दावा तानावडे यांनी केला.
तानावडे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे अभिनंदन केले. तानावडे म्हणाले,मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.कोरोनाचे संकट आणि अधिवेशन सुरु असताना देखील गोव्याचा विषय असल्याने पंतप्रधानांनी गोव्याचे सर्व विषय ऐकून ते सोडवण्यासाठी तयारी दाखवली आहे.म्हादईप्रश्नी गोव्यावर अन्याय होऊ देणार नाही,अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे.राज्य सरकारने नेहमीच गोव्याचे हीत जपले आहे.त्याला केंद्राची भक्कम साथ मिळत असल्याने राज्यातील भाजपचा जनाधार वाढत आहे.उलट काँग्रेस आणि मगो पक्ष विरोधासाठी विरोध म्हणून जे मुद्दे उपस्थित करत आहेत त्याला लोक प्रतिसाद देत नसल्याने त्यांना फक्त पत्रकार परिषदां पुरते मर्यादित रहावे लागत आहे.
कोरोना बाबत सर्वती खबरदारी सरकारने घेतली आहे.मतदानावेळी देखील आवश्यक उपाययोजना केली जाणार आहे. मतदान केंद्रे वातानुकूलीत नसल्याने काही समस्या उद्धवणार नाही.मतदारांनी चिंता न करता बाहेर पडून भाजपला विजयी करावे,असे आवाहन देखील तानावडे यांनी केले.
माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांची पहिली पुण्यतिथी 17 मार्च रोजी भाजपतर्फे पाळली जाणार आहे.राज्यातील प्रत्येक मतदारसंघात त्यादिवशी श्रद्धांजली वाहण्याचे एक किंवा दोन कार्यक्रम होणार आहेत.पर्रिकर यांचे गोव्यात भाजप रुजवण्यात आणि वाढवण्यात महत्वाचे योगदान आहे.त्यांची उणीव आम्हाला नेहमीच भासत राहणार आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांचा वारसा चालवत राज्य कारभार उत्तम हाकत आहे. आम्ही सर्व पर्रिकर यांचे कार्यकर्ते 22 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपला बहुमताने विजयी करुन आगळी वेगळी श्रद्धाजली वाहू, अशी माहिती तानावडे यांनी दिली आहे.