जिल्हा पंचायतींचा निधी सरकार दुप्पट करणार:मुख्यमंत्री

0
723
गोवा खबर:दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपची बहुमताने सत्ता येणार आहे.जिल्हा पंचायतींना अधिक सक्षम करण्यासाठी सरकार जिल्हा पंचायतींचा निधी दुप्पट करून ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्याचे आपले धोरण कायम ठेवणार,आहे असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
२२ मार्च रोजी होऊ घेतलेल्या जिल्हा पंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सध्या राज्यभर दौरा करून भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.काल सायंकाळी आणि आज सकाळी पेडणे तालुक्यातील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार मुख्यमंत्री सावंत यांनी केला.
मुख्यमंत्री म्हणाले,केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने राज्याच्या विकासासाठी काहीच कमी पडू दिले जाणार नाही.राज्याच्या भविष्यातील गरजा ओळखून विकास कामे हाती घेतली गेली आहेत.राज्य सरकार बरोबर केंद्र सरकारच्या मदतीने देखील अनेक कामे सुरु आहेत.
मोपा विमानतळ जलदगतीने पूर्ण केला जाणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,मोपा सुरु झाल्या नंतर हजारो रोजगार उपलब्ध होणार असून त्याचा लाभ गोमंतकीयांना होणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले,येत्या दोन दिवसात स्टाफ सिलेक्शन कमीशनतर्फे 8 ते 10 हजार सरकारी नोकऱ्यांसाठी भरती केली जाणार आहे.त्याशिवाय खाजगी क्षेत्रात किमान 30 ते 40 हजार रोजगार निर्मिती होणार असून हे रोजगार प्राधान्याने स्थानिकांना मिळावेत यासाठी आवश्यक ती कायदेशीर तरतुद केली जाणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले,खाणी सुरु करण्यासाठी सगळे प्रयत्न सुरु आहेत.लवकरच त्यातून मार्ग निघू शकेल,अशी आशा बाळगुया.म्हादई प्रश्नी आपले सरकार गंभीर आहे.गोव्यावर म्हादई प्रश्नी अन्याय होऊ देणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला आश्वस्त केले आहे.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यामुळेच राज्यात खाणीचा आणि म्हादईचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
भाजपने केलेल्या विकास कामांवर जनतेचा विश्वास आहे.भाजपचा जनाधार वाढतच आहे.त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे.दोन्ही जिल्हा पंचायती भाजपच जिंकणार असून विरोधकांना त्यांची जागा या निवडणुकीत दाखवून द्या,असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले आहे.