जशास तसे उत्तर देऊ : भाजपचा इशारा 

0
106
गोवा खबर : आम आदमी पक्षाच्या दादागिरीला भिक न घालण्याचे भाजपने ठरवले आहे. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या १० आमदारांना भाजप एकाकी सोडणार नाही. भाजप पक्ष संघटना आणि कार्यकर्ते या आमदारांसोबत आहेत. या आमदारांवर कोणी बलप्रयोग करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याचे भाजपने ठरवले आहे.
आप पक्षाने असेच हातघाईचे राजकारण केल्यास त्याना आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा सज्जड दम भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक यांनी आज दिला.
नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा यांच्या घरावर आपच्या उपाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी मोर्चा आणल्यावर तिथे जो प्रकार घडला याची गंभीर दखल भाजपने घेतली आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी शांतताप्रिय गोव्यात असंस्कृत राजकारण आप आणत असल्याचा आरोप केला.  त्यांचे हे प्रकार आम्ही खपवून घेऊ या भ्रमात त्यांनी राहू नये, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे असे ते म्हणाले.