जलस्त्रोत मंत्र्यांना मंत्रीमंडळातून वगळून म्हादईवर श्वेतपत्रिका काढा:काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना आव्हान 

0
122
गोवा खबर:म्हादई संबंधी काॅंग्रेस सरकारला जबाबदार धरणाऱ्या मुख्यमंत्र्यानी तत्कालीन जलसंसाधन मंत्री असलेले फिलीप नेरी रोड्रिगीस यांना आपल्या मंत्रीमंडळातुन बडतर्फ करूनश्वेतपत्रीका काढण्याची हिम्मत दाखवावी, असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना दिले आहे.
चोडणकर म्हणाले, म्हादई संबंधी काॅंग्रेस सरकारला जबाबदार धरणाऱ्या मुख्यमंत्र्यानी “बोले तैसा चाले” म्हणी प्रमाणे करून दाखवत तत्कालीन जलसंसाधन मंत्री असलेले फिलीप नेरी रोड्रिगीस यांना आपल्या मंत्रीमंडळातुन बडतर्फ करावे व म्हादई विषयावर सर्व आकडेवारी व घटनाक्रम देऊन श्वेतपत्रीका काढण्याची हिम्मत दाखवावी.
डाॅ. प्रमोद सावंत यांच्याकडे सत्याला सामोरे जाण्याची हिम्मत नाही. दुसऱ्यांना जबाबदार धरुन ते आपला पळपुटेपणा दाखवत आहेत असा आरोप  चोडणकर यांनी केला आहे.
काल म्हादई प्रश्नावर २००६ च्या काॅंग्रेस सरकारला जबाबदार धरण्याच्या मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याचा खरपुस समाचार घेताना काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षानी मुख्यमंत्र्यांनाच म्हादईच्या सद्य परिस्थीतीसाठी जबाबदार धरले आहे.
काॅंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परवा मध्यरात्री केलेल्या आंदोलनामुळेच भाजप सरकारला जाग आली व आज सर्वोच्च न्यायालयात अवमान याचीका दाखल करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी केली असा दावा  चोडणकर यांनी केला आहे.
म्हादई प्रश्नावर गेल्यावर्षी गोव्याचा विश्वासघात करणाऱ्या केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा काॅंग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी इफ्फि- २०१९ वेळी निषेध केला होता. म्हादई प्रश्नावर केंद्र सरकारकडे गोमंतकीयांच्या भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त करुनही सरकारला जाग आली नाही. त्यामुळेच परवा परत एकदा आमच्या म्हादई रक्षकांना आंदोलन करावे लागले. आई म्हादई चे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य असल्याची जाणीव प्रत्येक काॅंग्रेस कार्यकर्त्यांला आहे व त्या सर्वांचा मला व पक्षाला अभिमान आहे असे  चोडणकर म्हणाले.
गेल्या दोन वर्षात भाजप सरकारने कर्नाटक राज्याला दिलेला सर्व परवानगीं बद्दल स्पष्टिकरण द्यावे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हादई सबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री  उत्तर देतील असे सांगुन डाॅ. प्रमोद सावंत यांना उघडे पाडले आहे  व त्यामुळेच मुख्यमंत्री इतरांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप  चोडणकर यांनी केला आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात अवमान याचीका दाखल करणार असल्याचे काल जाहिर करणारे मुख्यमंत्री मागील एक वर्ष झोपले होते का असा प्रश्न चोडणकर यांनी विचारला आहे. भाजपच्या मनात पाप असल्यानेच गेल्या वर्षी म्हादई प्रश्नावर सर्व पक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे न नेता त्यांनी प्रकाश जावडेकरांकडे नेले होते असा आरोप चोडणकर यांनी केला आहे.
काॅंग्रेसचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गोव्यातील सर्व पक्षीय शिष्ट मंडळ थेट पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांच्याकडे नेले होते याची आठवण करुन देत, तत्कालीन पंतप्रधानानी म्हादई जलतंटा लवादाची स्थापना करुन गोव्यावर अन्याय होणार नाही याची स्पष्ट ग्वाही गोमंतकीयाना दिली होती याची आठवण  चोडणकर यांनी करून दिली.
म्हादई जलतंटा लवादाचा निवाडा अधिसुचीत करावा अशी मागणी मागणी करणाऱ्या कर्नाटकच्या याचीकेवर गोवा सरकारने आक्षेप का घेतला नाही हे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी सांगावे. गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात लवादाच्या निवाड्यावर टिप्पणी केलेली असतानाच, सदर निवाडा अधिसुचीत करण्यास गोवा सरकारने मूक संमती कशी दिली असा प्रश्न  चोडणकर यांनी विचारला आहे.
क्रोनी क्लबसाठी गोव्यात कोळसा हब करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने  मुख्यमंत्री प्रमोद सावंत व स्थानीक भाजप पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने गोव्याची जीवनदायीनी म्हादईचा राजकीय फायद्यासाठी सौदा केला हे आम्ही परत एकदा सांगतो असे  चोडणकर म्हणाले.