जर भाजप इतर पक्षातील आमदार रात्रीचे  चोरून नेऊ शकतो, तर मंत्री जावडेकरांची भेट रात्रीची का होऊ शकत नाही: गिरीश चोडणकर 

0
290
गोवा खबर: केंद्रिय मंत्र्याना भेटणे हा प्रत्येक नागरीकाला घटनेने दिलेला अधिकार आहे. जनतेचा हा लोकशाही हक्क भाजप  सरकार नाकारू शकत नाही. गोव्यात भाजपची जाहिरतबाजी करण्यास आलेल्या केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाजपने कर्नाटक राज्याकडे केलेला म्हादईचा सौदा, मोदींच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठी मोले अभयारण्य नष्ट करण्याचा सरकारचा डाव, गोव्याचे कोळसा हब मध्ये रुपांतर करण्याचा सरकारचा प्रयत्न, शेळ मेळावली येथील सुपीक जमिनीवर आयआयटी प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला होणार शेतकऱ्यांचा विरोध तसेच इतर विषयांवर एक शब्द काढलेला नाही. यामुळेच काॅंग्रेस कार्यकर्त्यांना विरोध प्रदर्शन करणे भाग पडले, असे काॅंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगीतले. 
म्हादईच्या रक्षणासाठी काॅंग्रेसचा म्हादई जागोर न्याय मिळे पर्यंत चालुच राहणार असल्याचा इशारा त्यानी दिला.जर भाजप इतर पक्षातील आमदार रात्रीचे  चोरून नेऊ शकतो, तर मंत्री जावडेकरांची भेट रात्रीची का होऊ शकत नाही? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजपला केला आहे. भाजपने काॅंग्रेसने रात्रीच्या वेळी जावडेकरांची भेट घेण्याचा प्रयत्न केला यावर नापसंती व्यक्त केली होती.
म्हादई प्रश्नावर काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या निषेध आंदोलनाची नोंद इतिहासात राहणार आहे. गोव्याची जीवनदायीनी म्हादईसाठी लढा देणाऱ्या तसेच विरोध प्रदर्शन करताना पोलिसांनी अटक केल्याने संपुर्ण रात्र कोठडीत घालवणाऱ्या सर्व काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे. त्यांचा हा लढा कदापी वाया जाणार नाही, असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत म्हणाले. इफ्फि उद्घाटन सोहळ्यात काॅंग्रेस कार्यकर्त्यानी म्हादई जागोर केला होता परंतु सरकारला अजुनही जाग न आल्याने काल परत निषेध प्रदर्शन करावे लागले असे  कामत पुढे म्हणाले.
काॅंग्रेसचे संकल्प आमोणकर, जनार्दन भांडारी, वरद म्हार्दोळकर, मेघश्याम राऊत, अर्चित नाईक, साईश आरोसकर, उबेद खान, चंदन मांद्रेकर, नवदिप फळदेसाई, विशाल वळवईकर, हिमांशु तिवरेकर, सुदिन नाईक, प्रसाद परब, उमेश परब व नितीन परब या १६ कार्यकर्त्यांना शुक्रवारी मध्यरात्री पणजी पोलिसांनी अटक केली होती. आज त्यांना सोडल्यानंतर पणजी न्यायालयासमोर त्यांचे स्वागत करताना काँग्रेस नेते बोलत होते.
 दरम्यान, काॅंग्रेस मुख्यालया समोर केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, माजी आमदार आग्नेल फर्नांडीस व उत्तर गोवा जिल्हा काॅंग्रेस अध्यक्ष विजय भिके यांनी भाजप सरकारचा तिव्र निषेध करणारी भाषणे केली. भाजप सरकार गोव्याचे पर्यावरण नष्ट करीत असल्याचा आरोप सर्वांनी केला.
तत्पुर्वी काॅंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर व विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी काॅंग्रेस शिष्टमंडळासह पणजी पोलिस स्थानकात जावून सर्व कार्यकर्त्यांची त्वरीत सुटका करण्याची मागणी केली.