गोवा खबर: कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण भारतात सापडला त्यावेळे पासुनच आम्ही सरकारला योग्य दक्षता घेण्याची सुचना केली होती. गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने योग्य खबरदारी घेण्याची मागणी केली होती. परंतु मुख्यमंत्र्यानी जिल्हा पंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार करण्याच्या नादात लोकांच्या आरोग्याकडे पुर्ण दुर्लक्ष केले. आज कोरोना व्हायरसचे महाभंयकर संकट समोर असताना, लोकांच्या आरोग्याची जबाबदारी सरकार घेणार नाही असे विधान करुन डाॅ. प्रमोद सावंत यानी तमाम गोमंतकीयांचा घोर अपमान केला आहे,अशी टिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
Blaming people is bad sign of Governance. No need of GOVERNMENT If people were expected to resolve all issues themselves. It’s complete collapse of administration in Goa under @goacm which he admitted by blaming people. @INCGoa https://t.co/WdMSRh5aid
— Girish Chodankar (@girishgoa) March 27, 2020
जनतेचे हित जपण्यास असमर्थ ठरलेल्या डाॅ. प्रमोद सावंताना एक दिवसही मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नसुन, त्यानी ताबडतोब राजीनामा देणे हेच जनतेच्या हिताचे आहे,अशी मागणी करत चोडणकर म्हणाले, त्यानी राजीनामा न दिल्यास राज्यपालांनी त्याना बडतर्फ करुन सुत्रे आपल्या हातात घ्यावी.
चोडणकर म्हणाले,जीवनावश्य वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने उघडी ठेवावी असे स्पष्ट निर्देश केंद्रिय गृह मत्रालयाने दिलेले असताना, त्याविरूद्ध निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याना कोणी दिला हे प्रमोद सावंतानी सांगावे. मुख्यमंत्री हे पंतप्रधानांपेक्षा मोठे असु शकत नाहीत हे प्रमोद सावंत यानी ध्यानात ठेवावे व प्रधानमंत्र्यांचे भाषण परत निट ऐकावे.
कोरोना व्हायरसवर राजकारण करुन, जीवनावश्यक सेवांचा पुरवठा करण्याची रास्त मागणी करणाऱ्यांना ‘विघ्नसंतोषी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यानी गोमंतकीयांची जाहिर माफी मागावी,अशी मागणी करत चोडणकर म्हणाले, स्वतःला वैद्य म्हणणाऱ्या प्रमोद सावंताना लहान मुलांसाठी दूध किती महत्वाचे असते हे चार दिवस कळु नये हे धक्कादायक आहे.
मुख्यमंत्र्याना गोमंतकीयाच्या हिताचे अजिबात पडलेले नाही हे मागील 85 दिवस गोव्यात साधी टेस्टींग सुविधा सुरू करण्यास त्याना आलेल्या अपयशावरुन स्पष्ट होते,असे सांगून चोडणकर म्हणाले, मागील 85 दिवस आम्ही सरकारला दररोज याची आठवण करुन देतो पण केवळ अहंकारामुळे त्यांनी आमच्या मागणी कडे दुर्लक्ष केले आहे. गोमेकॉपासुन दूर कोरोंटायन सेंटर सुरू करण्याच्या आमच्या मागणीसही त्यानी एवढे दिवस काहीच प्रतिसाद दिला नाही व आता तीन रुग्णसापडल्यानंतर धावाधाव चालु आहे.
कोरोना विषयी आता लोकांना ज्ञान पाजण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रमोद सावंताना पंतप्रधानानी देशाला केलेल्या पहिल्या संबोधनापुर्वी या बद्दल काहिच माहित नव्हते हे त्यानीच मान्य केले आहे. लोकांना सामाजीक दूरावा पाळा म्हणुन सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यानी स्वतः मात्र त्याबद्दल अज्ञभिज्ञ राहणे हे दुर्देवी आहे,अशी टिका चोडणकर यांनी केली.
गोव्यातील डाॅक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचारी तसेच पोलीस यांना कोरोनाच्या संसर्गापासुन बचाव करण्यासाठी साधे मास्क देणेही सरकारला जमले नसुन, लोकांच्या आरोग्याकडे सरकारने खेळ मांडला आहे,असा आरोप चोडणकर यांनी केला आहे.
आपल्या नाकर्तेपणाचे खापर जनतेच्या माथी फोडणाऱ्या व लोकांना विघ्नसंतोषी म्हणणाऱ्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी ताबडतोब पायउतार व्हावे,अशी मागणी करत चोडणकर म्हणाले,सरकारने हात वर केल्याने लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घेणे आता महत्वाचे ठरले आहे. जनतेने पुर्ण संयम राखावा व गर्दी टाळुन एकामेकांपासुन योग्य अंतर ठेवावे. अगदी तातडीची गरज भासल्यासच घराबाहेर पडावे,असे आवाहन चोडणकर यांनी केले आहे.