जनतेच्या प्रश्नावर चर्चेचा स्थगन प्रस्ताव चर्चेस न घेतल्यास विधानसभेचे कामकाज चालू देणार नाही:सरदेसाई

0
474
गोवा खबर:राज्यात सध्या कोविडमुळे ३६ जणांचे बळी घेलेले आहेत. शनिवारी एकाच दिवशी सहा जणांना प्राण गमवावे लागले होते. ज्यात एका १४ वर्षीय मुलीचा समावेश होता. जनतेच्या आरोग्याच्या महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यास सरकार तयार नसल्याचे दिसत असल्याने आम्ही यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडणार असून तो चर्चेस न घेतल्यास विधानसभेचे कामकाज चालू दिले जाणार नाही, असा इशारा  गोवा फाॅरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिला आहे.

तीन आठवड्यांचे अधिवेशनाचा कालावधी कमी  करून उद्या सोमवारी एक दिवशीय अधिवेशन घेण्यात येणार आहे. या अधिवेशनात कोविडवर चर्चा होणार नाही हे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे आम्ही स्थगन प्रस्ताव मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हा प्रस्ताव चर्चेस न घेतल्यास सरकार लोकशाहीची हत्या करत असल्याचे सिद्ध होईल, असा आरोप सरदेसाई यांनी केला.
 या अधिवेशनात काही दिवसांपूर्वी  जे अंदाजपत्रक मांडण्यात आले होते त्यावर चर्चा न करताच मंजूरी घेणे त्याच बरोबर कित्येक  मागण्या व बिले यांना मंजूरी मिळवली जाणार आहे. मात्र जनहिता दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या कोविड महामारीसंदर्भात सरकारची काय तयारी आहे यावर चर्चा होणार नाही हे कामकाज पत्रिकेवरून  स्पष्ट होत असल्याचे सरदेसाई यांनी नजरेस आणून दिले.
कोविड महामारी विषय तसेच मोले येथे केल्या जाणाऱ्या अडीच लाख झाडांच्या कत्तलीसंदर्भात तसेच राज्याच्या तिजोरित खडखडाट असल्याने आर्थिक स्थिती बेताची आहे यावर चर्चा आवश्यक आहे. मात्र सरकारला असे म्हणायचे आहे की विरोधकांनी फक्त ऐंकून घ्यायचे ? मात्र तसे होणार नसून आमच्याकडे लोकशाही पद्धतीत एक हत्यार आहे, कामकाज प्रक्रियेनुसार नियम ६९ अंतर्गत जनतेच्या महत्वाच्या विषयावर चर्चा करण्याची मागणी उचलून धरणे व ती हा स्थगन प्रस्ताव आणून आम्ही करणार असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केल्यामुळे उद्याचे एक दिवसीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.