गोवा खबर:कोणत्याही घटनेतील तथ्य शक्य तेवढ्या अचूक पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवून जनतेची सेवा करावी हेच पत्रकाराचे मिशन असते, असे मत माहिती अधिकारी  जॉन आगियार यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व मास कम्युनिकेशन विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सध्या गोवा भेटीवर आहेत. गोवा सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्याला त्यांनी दिलेल्या भेटीवेळी व पाटो-पणजी येथील कला व संस्कृती खात्याच्या बहुद्देशीय सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी  आगियार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

शिक्षक डॉ. शिवाजी जाधव व ३१ विद्यार्थ्यांचा समुह अभ्यासदौर्‍यानिमित्त गोवा भेटीवर आले आहेत. गोव्यातील प्रसारमाध्यमे, त्यातील व्यक्ती, राजकीय व्यक्ती व त्यांचे चालणारे कार्य याबद्दल जाणून घेणे हा त्यांच्या दौर्‍याचा मुख्य उद्देश आहे.

आगियार पुढे म्हणाले , चांगला पत्रकार हा आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा जपतो. सत्य लोकांसमोर आणणे हेच पत्रकाराचे काम आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच खात्याच्या कार्याबाबतही माहिती दिली.

माहिती सहायक  श्याम गांवकर व जान्हवी सावईकर यांनी विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.  श्याम गांवकर यांनी पत्रकारांसाठी असलेल्या खात्याच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली, तर जान्हवी सावईकर यांनी मिडीया मॉनिटरिंग सेलबाबत माहिती दिली.