छोट्या अन्न प्रक्रिया उध्योगासाठी खास योजना

0
458

गोवा खबर : भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उध्योग मंत्रालयाची सुक्ष्म अन्न प्रक्रिया उध्योगासाठी असलेली योजना गोव्यातही चालीस लावण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. भारत सरकारच्या या नवीन योजनेनुसार एक जिल्हा एक उत्पादन आधारित उध्योग विकसीत करण्यात येणार आहे. गोवा सरकारने उत्तर गोव्यासाठी फणस व दक्षिण गोव्यासाठी नारळ प्रक्रिया उध्योगावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत केंद्र सरकारने ३० जून २०२० रोजी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उध्योग अधिकृतीकरण योजना  या छोट्या अन्न प्रक्रिया उध्योगासाठीच्या योजनेची घोषणा केली.   भारत सरकारची ही योजना संपूर्ण देशात लागू करण्याची तयारी सर्व राज्यात सुरू आहे. गोवा सरकारने या योजनेसाठी उत्तर गोव्यासाठी फणस व दक्षिण गोव्यासाठी नारळ या उत्पादनाची निवड केली आहे. तसेच योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उध्योग मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. गोव्याचे मुख्यसचिव परिमल राय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यस्तरीय मान्यता समितीने वरील दोन्ही जिल्हा उत्पादनांना मान्यता दिली. यावेळी या योजनेचा लाभ अधिकाधिक छोट्या उद्योगांपर्यत पोचवण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांच्या अथिकृतीकरण करण्याच्या या योजनेअंतर्गत वैयक्तिक आणि समुह स्तरांवर ही योजना राबविण्यात येणार आहे. वैयक्तिक मालकीच्या नवीन उद्योगाची स्थापना तसेच अस्तित्वात असलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी ३५ टक्के अनुदान १० लाखांच्या मर्यादेत देण्यात येणार आहे. या सुक्ष्म उद्योगांना पुरक अशा साधन सुविधांची निर्मिती करण्यासाठी समुहांसाठी चार योजनांचा समावेश आहे.  त्याचा लाभ स्वयं सहाय्य गट, शेतकरी उत्पादन समुह आणि उत्पादक सहकारी संस्थांना घेता येईल.

केंद्र सरकारची ही योजना मार्च २०२५ पर्यंत कार्यरत राहणार आहे. या योजनेची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया लवकरच केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून सुरू करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गोवा सरकारने उद्योग व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाची निवड केलेली आहे.