छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवाःमुख्यमंत्री

0
632

गोवा खबर:साखळी येथील रविंद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक दिनाप्रित्यर्थ विशेष कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर रविंद्र भवनचे उपाध्यक्ष श्री विठोबा घाडी, नगरसेवक श्री. आनंद काणेकर, सदस्य सचीव श्रीपाद आर्लेकर, सदस्य श्री. गोपिनाथ गावस, अजित देसाई, सौ. स्वाती माईणकर, अनिल काणेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

सुरूवातीला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आजच्या तरूणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून मार्गक्रमण करण्यास सांगून शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य आजच्या पिढीसमोर आणण्याची नितांत गरज असल्याचे सांगितले.

डॉ. सावंत पुढे म्हणाले , छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत प्रत्येक दिवस साजरा करण्याची गरज असून त्यामुळे शिवाजी महाराजांची किर्ती आणि त्यांचे महान कार्य जनमानसात पोहचविण्यास अधिक मदत होईल असेही ते म्हणाले.

श्री. लक्षराज आमोणकर यांनी सर्वांचे स्वागत केले.