चोर्ला घाटातील अपघातात 2 कार जळून खाक;42 हजारची रोकड भस्मसात

0
804
गोवा खबर: चोर्ला घाटात दोन कारची समोरासमोर जोरदार टक्कर होऊन दोन्ही कार पूर्णपणे जळून खाक झाल्या. अपघातात कारचालक सुखरूप बचावले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास केरीतून दहा किलोमीटर अंतरावर वाईल्डरनँस्ट या रिसॉर्ट नजीक झाला.
 या अपघातात  ऑडी  व शरवलेट कार जळून खाक झाल्या. एका कारमध्ये असलेली 42 हजाराची रोकड देखील यात भस्मसात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सांगली येथील कार मालक सतीश विनायक चव्हाण हे एमएच 01 एल 9639 या ऑडी कारने बेळगावहून गोव्याच्या दिशेने येत होते तर बेळगाव येथील अरुणकुमार परशुराम लोकरे हे गोव्याहून बेळगाव कडे शेवरलेट कार एमएच 03 एएम 8782 ने जात होते. गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन्ही कार चोर्ला घाटातील वायल्डरनँस्ट या रिसॉर्टकडे पोहोचली असता ऑडी कार चालक सतीश चव्हाण यांचा कारवरील ताबा सुटला आणि त्यांची शेवरलेट कारशी धडक झाली.ही धडक इतकी जोरदार होती कि दोन्ही कार दहा फूट दरीत कोसळल्या.या अपघातात जीवितहानी टळली. दरम्यान काही वेळाने शेवरलेट कारने अचानकपणे पेट घेतला आणि नंतर ऑडी कारही त्यात झोकाळून पेटली.
दरम्यान शेवरलेट कार चालक अरुण कुमार यांनी एका वाहनाद्वारे केरीत येत मोबाईलवरून पोलीसां 100 नंबरवर व वाळपई अग्निशमन दलाशी संपर्क साधून मदत मागितली. त्यानंतर त्वरित अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही वाहनांना लागलेली आग आटोक्यात आणली.
मात्र तोपर्यंत दोन्ही वाहने आगीमध्ये जळून खाक झाली होती. ऑडी कारमध्ये असलेले रोख रुपये 42,000 व इतर सामान तसेच शेवरलेट कारमध्ये असलेले सामान जळून खाक झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
 ऑडीकार मालक सतीश चव्हाण द्राक्ष फळांचे नमुने घेऊन पणजीच्या दिशेने येत होते तर दोन दिवसापूर्वी गोव्यामध्ये फिरायला आलेले अरुण कुमार चव्हाण व त्यांचे मित्र फैजान कोल्हापुरे हे दोघेही बेळगावच्या दिशेने माघारी फिरत असताना हा अपघात झाला.