चित्रपट आर्थिक सहाय्य योजना जाहीर

0
1042
गोवा खबर:गोव्यात चित्रपट संस्कृती वाढीस लागावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या गोवा मनोरंजन संस्थेने आज चित्रपट आर्थिक सहाय्य योजना जाहिर केली आहे.कोकणी आणि मराठी भाषेत दर्जेदार चित्रपट बनावे यासाठी ही योजना आहे.राज्यातील चित्रपट निर्मात्यांसाठी ही योजना वरदान ठरत आहे.अनेक चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यात ही योजना यशस्वी ठरली आहे.
गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी आज  १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत निर्मित चित्रपटांना आर्थिक सहाय्य योजना जाहिर करून त्यासाठी अर्ज मागवले आहेत.
वरील कालावधीत केवळ  राज्यातील चित्रपट निर्मात्यांनी तयार केलेले कोकणी व मराठी फीचर चित्रपट आणि कोकणी, मराठी, हिंदी व इंग्लीश नॉन फीचर चित्रपटांसाठी ही योजना लागू असणार आहे. सर्व चित्रपटांना इंग्लीश सबटायटल्स असणे गरजेचे आहे. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत सेन्सॉर दाखल दिलेला असावा.
कोकणी व मराठी फीचर चित्रपटांना अ श्रेणीत ५० लाख रुपये, ब श्रेणीत ३० लाख रुपये आणि क श्रेणीत  १० लाख रुपये किंवा लेखापरीक्षित विवरणानुसार झालेला एकूण खर्चाच्या ५० टक्के आणि सादर केलेले आयकर विवरण यापैकी जे कमी असेल त्यानुसार दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे कोकणी, मराठी, हिंदी व इंग्लीश नॉन फीचर चित्रपटांसाठी अ श्रेणीसाठी र१० लाख, ब श्रेणीसाठी  ५ लाख आणि क श्रेणीसाठी ३ लाख रुपये किंवा लेखापरीक्षित विवरणानुसार झालेला एकूण खर्चाच्या ५0 टक्के आणि सादर केलेल्या आयकर विवरण यापैकी जे कमी असेल त्यानुसार सहाय्य केले जाणार आहे.
राज्य सरकारच्या मंजुरीने या संस्थेद्वारे स्थापन केलेल्या गोवा राज्याबाहेरील चित्रपट तज्ञांच्या ५ सदस्यीय समितीद्वारे मूल्यमापन केले जाणार आहे. फीचर किंवा नॉन फीचर प्रकारांमध्ये जे चित्रपट अ, ब वा क श्रेणीखाली येणार नाहीत त्यांना अनुदान दिले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.
चित्रपट आर्थिक सहाय्य योजना पात्रता आणि अर्जांसाठी www.esg.co.in या संकेतस्थळावर अपलोड केलेले १० नोव्हेंबर २०१६ रोजीचे राजपत्र मालिका १ क्र. ३२ पणजी पहावे,असे कळवण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  २७ आॅगस्ट  आहे. त्याशिवाय सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागीय श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या फीचर चित्रपटांच्या निर्मात्यास  २० लाखांचे जादा सहाय्य देण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही अन्य सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या चित्रपटाला  २० लाख, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाला २५ लाख रुपये,  एफआयएपीएफद्वारा मान्यताप्राप्त चित्रपट महोत्सवात किंवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये गोल्डन लोटस पुरस्कार विजेत्या फीचर चित्रपटास  ३० लाख दिले जाणार आहेत. एफआयएपीएफद्वारा मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार विजेत्या नॉन फीचर चित्रपटाला  ७.५० लाख आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटास  ५ लाख रुपये दिले जाणार आहेत.
याशिवाय एफआयएपीएफद्वारा मान्यताप्राप्त राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार विजेत्या कलाकार व तंत्रज्ञांना केवळ  २ महोत्सावांसाठी सहाय्य दिले जाणार आहे.