चित्रपट आणि मनोरंजन उद्योगाच्या प्रतिनिधींनी मुंबईत घेतली पंतप्रधानांची भेट

0
2463
A delegation representing the film and entertainment industry, calling on the Prime Minister, Shri Narendra Modi, Mumbai, Maharashtra on December 18, 2018. The Governor of Maharashtra, Shri C. Vidyasagar Rao is also seen.

गोवा खबर:चित्रपट आणि मनोरंजन उद्योगातल्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत भेट घेतली. या शिष्टमंडळात निर्माते आणि मनोरंजन उद्योगातल्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

भारताला भविष्यात पाच ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पाला शिष्टमंडळाने पाठिंबा दर्शवला. भारतात प्रसारमाध्यम आणि मनोरंजन जगताची वाढ होण्याची मोठी क्षमता आहे असे सांगत शिष्टमंडळाने याची सविस्तर माहिती पंतप्रधानांना दिली. भारताच्या अर्थव्यवस्थेत चित्रपट उद्योग मोठे योगदान देऊ शकतो असेही शिष्टमंडळाने म्हटले.

मनोरंजन उद्योगासाठी लावण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवा कराचे दर एकसमान आणि कमी असावेत अशी विनंती या शिष्टमंडळाने पंतप्रधानांना केली.

जागतिक मनोरंजन विश्वाची राजधानी म्हणून मुंबईचा विकास करायला हवा आणि त्यासाठी अनेक उपक्रम व अभिनव योजना राबवण्याची गरज आहे असेही या प्रतिनिधींनी सांगितले.

भारतीय चित्रपट जगभरात अत्यंत लोकप्रिय आहेत असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. भारताला सांस्कृतिकदृष्ट्या महासत्ता हा दर्जा देण्याच्या प्रक्रियेत चित्रपटाचा मोठा वाटा आहे असेही पंतप्रधान म्हणाले. प्रसारमाध्यम आणि मनोरंजन विश्वाला सरकारचा भक्कम पाठिंबा असून शिष्टमंडळाने दिलेल्या सूचना आणि विनंतीचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

या शिष्टमंडळात अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, राकेश रोशन, प्रसून जोशी, करण जोहर आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांचा समावेश होता.