घोडेमळ गाव कंटेन्मेंट झोन म्हणून तर देऊळवाडा आणि कासारवाडा गाव बफर झोन म्हणून जाहीर

0
435

 

गोवा खबर:उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी  आर. मेनका आयएएस यांनी सत्तरीतील कोरोना पॉजिटिव्ह रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे व करोनाचा प्रसार रोखण्यासाठी घोडेमळ गांव हा कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला असून कासारवाडा आणि देऊळवाडा बफर झोन म्हणून जाहीर केला आहे.

      ही परिस्थिती हाताळण्यासाठी या भागातील जास्तीत जास्त नागरिकांच्या कोविड चाचण्या करण्यात येणार आहेत तसेच क्वारंटाईन, आयसोलेशन, सामाजिक अंतर आणि इतर आरोग्यासंबंधित उपाय कन्टेन्मेंट झोनमध्ये हाती घेण्यात येतील.

      करोनाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्तरी तालुक्यात रॅपिड रिस्पोन्स टीमची नियुक्ती करण्यात आली असून त्यात सत्तरी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी आणि एसडीएम, डिचोलीचे पोलीस उपअधिक्षक, आरोग्याधिकारी, सामाजिक आरोग्य केंद्र सांखळी, डिचोलीचे पंचायत सचिव, मोर्ले ग्रामपंचायत, वाळपईचे फायर स्टेशन अधिकारी, सत्तरी तालुक्याचे मामलेदार, वाळपई नागरी पूरवठा खात्याचे निरीक्षक आणि वाळपईतील पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता यांचा समावेश आहे.

      सांखळीतील आरोग्य अधिका-यांनी लोकांच्या कोविड चांचण्यावर लक्ष ठेवावे. कंटेन्मेंट झोनमधील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तींची थर्मल चांचणी घेण्यासाठी मेडिकल, एएनएमचे पथक दारोदारी भेट देऊन हे काम करणार आहे. कामावरील सर्व कर्मचा-यांना वैयक्तिक काळजी घेण्यासाठी वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे आणि थर्मल चाचणीसाठी इतर आवश्यक उपकरणे उपलब्ध केली जातील.

      फिरत्या तपासणी व्हॅनव्दारे सदर भागातील आजारी लोकांनी आरोग्य तपासणी करण्यात येईल. कोणतीही व्यक्ती आजारी सापडल्य़ास लाल शाईने मार्क करण्यात येईल त्यामुळे आवश्यक ती कारवाई करता येईल. सर्व सकारात्मक प्रकरणे कोविड केयर सेंटर किंवा हॉस्पीटलमध्ये पाठविण्यात येईल.

      वैयक्तिक संरक्षणासाठी काम करणा-या कर्मचा-यांना पीपीई, एन-९५ फेसमास्क, ग्लोव्स, हॅड सॅनिटाईझर, लिक्वीड साबण अशा सर्व वस्तू पुरविल्या जातील. कामावर असताना तसेच काम संपवून घरी जाताना योग्य सुरक्षा काळजी घेण्याच्या सूचना त्याना करण्यात आल्या आहेत. सांखळी सामाजिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिका-यांनी नियंत्रण कक्षात वैयक्तिक संरक्षण उपकरणे आणि आवश्यक औषधे उपलब्ध केली आहेत. म्बुलन्स आणि इतर पॅरा मेडिकल कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात येईल.

      कदंबचे व्यवस्थापकीय संचालक श्री. वेनान्सियो फुर्तादो दारोदोरी जाऊन थर्मल चाचणी घेणा-या कर्मचा-याना कंटेन्मेंट झोन आणि परत घरी सोडण्यासाठी दोन बसेस सुरू करतील.

      वाळपई नागरी पूरवठा खात्याचे निरीक्षण श्री दर्शन हरमलकर सत्तरीचे मामलेदार श्री ईशांत सावंत यांच्या सहकार्याने अन्यधान्याची यादी तयार करतील आणि दूध, भाज्यांची पॅकेट्स दारोदारी जाऊन वितरीत करतील ही पॅकेट्स पुरविणा-यांनी वैयक्तिक संरक्षण उपकरणे वापरावी आणि आतमध्ये न जाता बाहेरच ही पॅकेट्स ठेवावी.

      वाळपई सत्तरी येथील वीज खात्याचे साहाय्यक अभियंता श्री आवेलिन रॉड्रीगीज कंटेन्मेंट झोनमध्ये नियमित वीज पूरवठ्याचे काम पाहतील. तर पीडब्ल्युडीचे साहाय्यक अभियंता श्री प्रशांत गावडे पिण्याचे पाणी पुरविण्याचे काम पाहतील. त्याचप्रमाणे वाळपईतील बीएसएनएल नियमित दूरध्वनी सेवा देतील. कंटेन्मेंट झोनमध्ये गहन पाळत ठेवणारी यंत्रणा सुरू करण्यात येईल.