घुमटाला मिळाला राजमान्य लोकवाद्याचा दर्जा

0
1100
गोवा खबर:गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या लोककलेतील प्रमुख वाद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घुमट या वाद्याला आता गोव्याचे राजमान्य लोकवाद्य म्हणून दर्जा दिला आहे.
गणेश चतुर्थी मध्ये आरती किंवा भजन करताना घुमटाचा वापर सर्वत्र केला जातो.महाराष्ट्रात तबला वापरला जातो त्याऐवजी गोव्यात घुमट वापरले जाते.मडक्याला घोरपड किंवा बकऱ्याची कातडी बांधून हे वाद्य बनवले जाते.
 शुक्रवारी झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सरकारने हे गोव्याचे लोकवाद्य म्हणून घोषित केले.
घुमट हे गोव्याचे पारंपरिक लोकवाद्य म्हणून शुक्रवारी घोषित केल्याचे कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. घुमटला लोकवाद्याचा दर्जा मिळणे गरजेचे होते. या निर्णयामुळे घुमट या वाद्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
घुमटाला घोरपडीची कातडी वापरता येणार नाही. जुन्या काळात विशेष करुन आदिवासी लोक घोरपडीच्या कातडीचा वापर करायचे. एक पोटाचा व्यवसाय म्हणूनही याकडे पाहिले जायचे. मात्र आता सरकारने पर्यावरणाचा विषय, पर्यावरणप्रेमींचे म्हणणे व वन कायद्याचा विचार करुन घोरपडीची कातडी वापरली जाऊ नये, असा निर्णय घेतला आहे. वन कायद्यानुसार वन्य प्राण्यांची हत्या करता येत नाही. त्यामुळे एकूणच या सर्व गोष्टींचा विचार करुन सरकारने घुमटाबाबतचे धोरण ठरविले आहे.
घोरपडीच्या कातडयाला पर्याय म्हणून आता बकऱ्याचे चामडे घुमट वाद्याला वापरण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र घोरपडीचे कातडे सापडले तर ते जप्त केले जाणार नाही. काही ठिकाणी मागील पंधरा वर्षे एवढी जुनी घोरपडीची कातडी घुमटाना वापरली जात आहे. हे कातडे बरेच टिकाऊ असते,अशी माहिती मंत्री गावडे यांनी दिली.