गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले

0
1019
गोवा खबर:गोव्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.  आणखी एक दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पणजीत गेल्या 24 तासात 4 इंच व गुरुवारी सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या वेळेत साडेतीन इंच पावसाची नोंद झाली. दक्षिण गोव्यात सांगे व केपे भागात 8 इंचापेक्षाही जास्त  विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे. मुसळधार पावसाने राज्यातील नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत.
साखळीतील वाळवंटी नदीचे पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचले आहे. राज्यातील अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतूकीवर परिणाम झाला आहे. पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
 राज्याला गेले दोन दिवस पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आहे. राज्यात अनेक सखल भागात पाणी साचले आहे. अनेक भागात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.
 वादळी वाऱ्यामुळे झाडे कोलमडून पडलेली आहेत. काही भागातील वीज पुरवठा खंडीत झालेला आहे. गेले 48 तास उसंत न घेता पाऊस कोसळत आहे.
 गेल्या 24 तासांमध्ये पावसाने सर्वत्र जोर धरलेला आहे.  दक्षिण गोव्यात पावसाने अधिक जोर धरला आहे. सांगेमध्ये तब्बल 8.50 इंच तर केपेमध्ये सव्वा 8 इंच पावसाची विक्रमी नोंद एकच दिवसात झालेली आहे. मडगावात 110 मि. मी. म्हणजेच सव्वाचार इंच, फोंडा, मुरगाव व पणजीत 4 इंच, जुने गोवे व साखळीत प्रत्येकी साडेतीन इंच पावसाची नोंद झाली. पेडणे व काणकोणमध्ये प्रत्येकी 1 इंच पाऊस झाला. येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाच्या अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.