गोव्याला अवकाळी पावसाचा फटका; धावत्या ट्रेनवर झाड कोसळून एक ठार,3 जखमी

0
1038

गोवाखबर : अवकाळी पावसाचा फटका आज दक्षिण गोव्याला बसला.पावसाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या सोसाटयाच्या वाऱ्यामूळे धावत्या रेल्वेवर झाड कोसळून एक ठार,2 प्रवासी जखमी झाले.दक्षिण गोव्यातील बाळ्ळी येथे ही  घटना घडली.मेंगलोर येथून मुंबईला जाणाऱ्या मेंगलोर एक्सप्रेसवर रोड ब्रिज क्रॉस करत असताना झाड कोसळून मोठी दुर्घटना घडली.यात रेल्वेच्या दारावर उभ्या असलेल्या एका प्रवाशाला जीव गमवावा लागला तर इतर तिघे जखमी झाले आहेत.नागेश नाईक, आर.जे.नाईक आणि एम. साजिद अशी जखमींची नावे आहेत.झाड़ाच्या फांदया लागून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले.जखमीं पैकी 2 प्रवाशांनी ट्रेन सुटल्या नंतर पुढील प्रवास सुरु ठेवला.मृताची मात्र ओळख पटू शकली नाही.
 मोठे झाड कोसळल्याने बाळ्ळी-केपे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.वादळी वाऱ्यामुळे पांझरखणी गावातील एका वृद्ध महिलेच्या घराचे नुकसान झाले असून गावातील वीज पुरवठा देखील खंडीत झाला आहे.
 उत्तर व दक्षिण गोव्यातील काही भागांत सायंकाळी विजेच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता गोवा हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली होती.त्यानुसार दक्षिण गोव्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
 काणकोणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला.सांगे, केपे, कुडचडे या भागातही पावसाच्या सरी कोसळल्याने हवामानात बदल झाला. मडगावातही वाऱ्याचा वेग वाढला होता. बिगर मोसमी पावसामुळे नागरिकांची त्रेधा तीरपट उडाली.या पावसामुळे काजू आणि आंबा बागायतीचे नुकसान होणार असल्याने बागायतदार चिंतेत पडले आहेत.