गोव्यामध्ये भारतातील पहिल्या तरंगत्या जेट्टीचे लोकार्पण

0
1130

 गोवा खबर:केंद्रीय जलवाहतूक (स्वतंत्र प्रभार) तसेच रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व संरक्षण राज्यमंत्री आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पणजी येथे भारतातील पहिल्या तरंगत्या जेट्टीचे लोकार्पण केले.

याप्रसंगी मनसुख मांडवीय यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तरंगत्या जेट्टीचे फायदे नमूद करताना त्यांनी सांगितले की, या जेट्टीसाठी पर्यावरण मंजूरी प्रमाणपत्राची गरज पडणार नाही, त्यामुळे एक जेट्टी उभी करण्यासाठी लागणारा 2-3 वर्षांचा कालावधी आता लागणार नाही. तरंगत्या जेट्टीचे काम त्वरित होणारे असून ती कॉँक्रिट पासून तयार होते व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून देखील नेता येऊ शकते. आशा कमी खर्चात तयार होणाऱ्या तरंगत्या जेट्टीचा लाभ पहिल्यांदा गोव्याला मिळत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

आपल्या देशात जलवाहतूकीचा वापर पूर्वी होत असे, इतिहासात आपण याचे दाखले पहिले आहेत. आता देखील या जलवाहतूकीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता येऊन ठेपली आहे. रस्त्यावरच्या गर्दीला उपाय म्हणून अंतर्गत जलवाहतूक हा उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन मांडवीय यांनी यावेळी केले. देशात उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा लाभ घेऊन अर्थकारणासोबत जनसुविधा पुरविता येतील, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

येत्या 4 महिन्यात आणखी 3 जेट्टी गोव्यामध्ये सुरू होतील, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. या जेट्टी डेम्पो हाऊस, ओल्ड गोवा व शापोरा नदी येथे उभारल्या जातील.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी मांडवीय यांचे प्रस्तुत पुढकरासाठी आभार मानले. जलवाहतूकीमुळे वेळेचीव इंधनाची बचत होईल, असे सांगून गोवा सर्वच क्षेत्रात प्रगती करेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. वेगवान फेरीबोट गोव्यामध्ये चालवाव्यात, असे आवाहन नाईक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व राज्याचे बंदर मंत्री मायकल लोबो यांना या औचित्याने केले.

या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्याचे बंदर मंत्री मायकल लोबो, राज्यसभा सांसद विनय तेंडुलकर तसेच जलवाहतूक मंत्रालायाचे सचिव गोपाळ कृष्ण उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर मांडवीय यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्यातील बंदर व त्याच्या वापरासंबंधी असणाऱ्या समस्याबाबत मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक घेतली. यावेळी जलवाहतूक मंत्रालायाचे सचिव गोपाळ कृष्ण, संबंधित अधिकारी आणि ‘बार्ज ओनर असोसिएशन’ उपस्थित होते.

त्यानंतर मांडवीय यांनी वास्को मधील मुरगाव पत्तन न्यास येथे ‘क्रुज’ सुविधेचे देखील उद्घाटन केले व पत्तन न्यासाची पाहणी केली. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यावेळी उपस्थित होते.