गोव्याबाहेरील सहकारी संस्थांवर आता करडी नजर ­­­- मुख्यमंत्री   

0
1113

 गोवा खबर: गोव्याबाहेरून येणाऱ्या सहकारी संस्थांवर आता लक्ष ठेवण्यास सुरवात झालेली असून गोव्याबाहेरील सहकारी संस्थांवर गोव्यात येऊन गंडा घालण्याच्या प्रकाराला आता आळा बसेल असे मत मुख्यमंत्री डाँ प्रमोद सावंत यांनी साखळीत बोलताना व्यक्त केले.

      दिनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखेचे नव्या वास्तूत स्थलांतर करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डाँ प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

      आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले, सहकार क्षेत्र हे निस्वार्थी असायला हवे. संस्था चालकांमध्ये स्वार्थाचा विषय आला की सहकार संस्था डबघाईस येते, ज्यासाठी सहकार क्षेत्रात नवीन लोकानी येणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

      सहकार क्षेत्रातील लोकाना सरकार सतत मदत करत असून अशा संस्थाना संजीवनी देण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री डाँ प्रमोद सावंत यानी सांगितले. यावेळी त्यानी दिनदयाळ संस्थेच्या चांगल्या कार्यासाठी अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

      यावेळी व्यासपिठावर दिनदयाळ संस्थेचे अध्यक्ष श्री वल्लभ साळकर, उपाध्यक्ष श्री कांता पाटणेकर, सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक श्री संतोष नाईक, संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.

      सुरवातीला श्री कांता पाटणेकर यानी प्रस्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. सरव्यवस्थापक श्री जी.व्हाय. नायक यांनी संस्थेच्या उपक्रमाविषय़ीची माहिती दिली. सौ. सिध्दी प्रभू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर  श्री वल्लभ साळकर यानी उपस्थितांचे आभार मानले.