गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2021 दरम्यान 52 व्या इफ्फीचे आयोजन 

0
256
  • 52 व्या इफ्फीसाठी प्रकाश जावडेकर यांनी जारी केले पोस्टर

गोवा खबर : माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) 52 व्या आवृत्तीचे नियम व पोस्टर जारी केले. 20 ते 28 नोव्हेंबर 2021 या काळात हा महोत्सव गोव्यात होणार आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा आशियातील सर्वात जुना आणि भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून गणला जातो. जानेवारी 2021 मधील 51 व्या आवृत्तीचे यश लक्षात घेता इफ्फीची 52 वी आवृत्ती संमिश्र स्वरुपात आयोजित केली जाईल. गोवा राज्य सरकार आणि भारतीय चित्रपट उद्योग यांच्या सहकार्याने भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे चित्रपट महोत्सव संचालनालय (डीएफएफ) या महोत्सवाचे आयोजन करीत आहे.

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्यूसर असोसिएशन (एफआयएपीएफ) द्वारे इफ्फीला मान्यता आहे. दरवर्षी या महोत्सवात चित्रपट सृष्टीतील दर्जेदार कलाकृतींची निवड होते आणि भारत आणि जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित केले जातात.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 52 व्या आवृत्तीच्या स्पर्धात्मक विभागात सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत नोंदणी करता येईल.

भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या वेळी इफ्फीमध्ये भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे चित्रपट महोत्सव संचालनालय विशेष कार्य आढाव्याच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करेल. तसेच, त्यांच्या कारकिर्दीचा वारसा जपत, “चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार” या वर्षापासून प्रत्येक वर्षी इफ्फीमध्ये देण्यात येणार आहे.