गोव्यात 14 जूनपर्यंत राज्यव्यापी कर्फ्यूत वाढ

0
213
गोवा खबर : गोव्यात कोविडचे संकट अद्यापही कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेला राज्यव्यापी कर्फ्यू 14 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी सायंकाळी सोशल मीडियावरून याची माहिती दिली.
पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे 7 जून रोजी राज्यव्यापी कर्फ्यूची मुदत संपत होती. 7 जूननंतर कर्फ्यू वाढवला जाणार की निर्बंध शिथिल करून कायम ठेवला जाणार, याबाबतची उत्सुकता लोकांना लागून राहिली होती. रविवारी यासंदर्भात आढावा बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले होते; मात्र शनिवारी सायंकाळीच मुख्यमंत्र्यांनी राज्यव्यापी कर्फ्यू 14 जूनपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली.
पूर्वीच्या कर्फ्यूमधील नियमांनुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा होती. यावेळी मात्र सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
गोव्यात आज ठरल्याप्रमाणे मान्सुनचे आगमन झाले आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर रेनकोट, छत्र्या, प्लास्टिक कापड आदींची विक्री करणारी दुकाने सुरू ठेवण्यास सरकारने यावेळी मुभा दिली आहे. याशिवाय पावसाळ्यात घरदुरुस्ती करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी घरदुरुस्तीसाठी लागणार्‍या वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय स्टेशनरीची दुकानेही आता उघडता येणार आहे.
गोव्यात अद्यापही कोविडचे संकट कमी झालेले नाही. शनिवारी कोविडमधून 1 हजार 433 जण बरे झाले. 99 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात 567 नवीन रुग्ण सापडले असून एकूण सक्रिय रुग्ण 8 हजार 216 झाले आहेत. शनिवारी 17 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण कोविड बळींचा आकडा 2 हजार 744 झाला आहे. कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहित धरून सरकारने कृतिदलाची स्थापना केली असून बालरोगतज्ज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यव्यापी कर्फ्यू लागू झाल्यापासून कोविड रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. कोविडमुळे होणार्‍या मृत्यूंचा आकडाही कमी होऊ लागला आहे. पॉझिटिव्हिटी दर आता 13.73 टक्क्यांवर आला आहे. राज्यव्यापी कर्फ्यूत 14 जूनपर्यंत वाढ झाल्याने कोविड संकट आणखी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.