गोव्यात 12, 13 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय योग परिषदेचे आयोजन

0
1102

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार परिषदेचे उदघाटन:50 देशांतील सुमारे एक हजार प्रतिनिधी लावणार उपस्थितिती

 

गोवा खबर:गोव्यात12 आणि 13 नोव्हेंबर 2018 रोजी आंतरराष्ट्रीय योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कला अकादमीत आयोजित करण्यात आलेल्या परिषदेचे उदघाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी आज पणजी येथील पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी आयुष मंत्रालयाचे संयुक्त सचिव रणजीत कुमार, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे संचालक डॉ ईश्वर बसवरेड्डी यांची याप्रसंगी उपस्थिती होती.  

दोन दिवस चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी 50 देशांतील सुमारे एक हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील. एकूण 10 सत्रांमध्ये 50 योगगुरु योगासंबंधी मार्गदर्शन करतील. तसेच जागतिक आरोग्य संघटनेसाठी एक विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. योग केवळ योगगुरु आणि काही संस्थापुरताच मर्यादीत राहू नये तर ती जनचळवळ निर्माण व्हावी, हा या परिषदेमागचा उद्देश असल्याचं श्री नाईक म्हणाले. यापूर्वीच्या तीन परिषदा दिल्लीत झाल्या, चौथी परिषद प्रथमच दिल्लीबाहेर होत आहे. 12 तारखेला सकाळी रन फॉर योगाचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी बोलताना श्रीपाद नाईक यांनी धारगळ येथील प्रस्तावित अखिल भारतीय आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार संस्थेचा पायाभरणी सोहळयाविषयीही माहिती दिली. 13 तारखेला पेडणे तालुक्यातील धारगळ येथे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते संस्थेचा पायाभरणी सोहळा होणार आहे. याप्रसंगी राज्यपाल श्रीमती मृदूला सिन्हा, केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची उपस्थिती असणार आहे.

प्रस्तावित संस्थेत 250 खाटांचे रुग्णालय, ज्या माध्यमातून दरवर्षी पदवीधर, पदव्युत्तर आणि पीएचडीचे 500 विद्यार्थी शिक्षण घेतली. आयुर्वेदासाठी 100 खाटांचे रुग्णालय असेल. तर निसर्गोपचारासाठी 150 खाटांचे रुग्णालय आणि योग विभागात मधुमेह, ह्रदयासंबंधी विभागात 30 रुग्णांची व्यवस्था असेल. प्रस्तावित संस्थेत डॉक्टरांसाठी 67 खोल्या आणि 182 विद्यार्थ्यांसाठी 91 खोल्या असतील. संस्थेच्या उभारणीसाठी एकूण 301 कोटी रुपयांचा खर्च नियोजीत आहे.