गोव्यात 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी साई पादुका दर्शन सोहळा:हावरे

0
1070

पणजी:शिर्डी येथील साईबाबा यांच्या समाधीला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असल्याने २०१७-२०१८ वर्ष हे साई समाधी शताब्दी वर्ष म्हणून देशभर साजरे करण्याचा निर्णय शिर्डीच्या साई संस्थान व्यवस्था मंडळाने घेतला आहे.यानिमित्त धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक,
सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी आज पणजी येथे पत्रकार परिषदेत दिली.
शताब्दी वर्षभरात अनेक धार्मिक, अध्यात्मिक, वैचारिक आणि शैक्षणिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांपैकी साई पादुका दर्शन सोहळ्याचा शुभारंभ करण्याचा मान गोमंतकीयांना मिळणार आहे.साईबाबा यांच्या खऱ्या पादुका दर्शनाचा कार्यक्रम गोव्यातून सुरु असून गोमंतकीयांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हावरे यांनी यावेळी केली.
१२ ऑक्टोबर रोजी दुपारी साई पादुकांचे आगमन गोवा-महाराष्ट्र सीमेवरील पत्रादेवी येथे होईल असे सांगून उद्योजक अनिल खवंटे म्हणाले, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक साई पादुकांचे गोमंतकीयांच्या वतीने पत्रादेवी येथे स्वागत करणार आहेत. साई पादुका मिरवणुकीने पत्रादेवीहून पणजीला आणल्या जातील व बांबोळी येथील सुशोभित डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर ठेवल्या जातील. या पादुका भक्तांच्या दर्शनासाठी १३ ऑक्टोबर रोजी पहाटे काकड आरती नंतर खुल्या होतील. पत्रादेवी ते पणजी प्रवासात दहा ठिकाणी स्थानिक मंत्री वा आमदारांच्या नेतृत्वाखाली लोक साई पादुकांचे स्वागत करतील. १३ ऑक्टोबर रोजी दिवसभर लोकांना पादुकांचे दर्शन घेता येईल तसेच काकड आरती, मध्यान आरती, धुपारती आणि शेज आरतीत सहभागी होता येणार आहेत.
त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी साई भजनात दंग होणाऱ्या भक्तांसाठी दिवसरात्र महाप्रसादाची सोय करण्यात येणार आहे.
साई पादुका दर्शन सोहळ्यावेळी खास कलाकारांच्या कार्यक्रमाचा आस्वादही घ्यायला मिळणार असल्याचे खवंटे यांनी यावेळी सांगितले.