गोवा खबर:जीवाचा गोवा करण्यासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना यापुढे खबरदार रहावे लागणार आहे.बीच किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना कोणी आढळला तर तो दंडनीय अपराध ठरणार आहे.सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून रिकाम्या बाटल्या तेथेच टाकून देण्याच्या प्रकारामुळे कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली असून सरकारने त्याची दखल घेत कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे.
पणजी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उद्धाटना नंतर बोलताना मुख्यमंत्री पर्रिकर यांनी ही माहिती दिली. येत्या 15 दिवसात कायद्यात तरतूद करून त्याची पुढच्या महिन्यापासून कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, की सरकारने अबकारी कायद्यात यापूर्वीच दुरुस्ती केली आहे, पण ती दुरुस्ती अधिसूचित केली नव्हती. आता लवकरच अधिसूचना जारी केली जाईल. त्यासाठीचा मसुदा तयार होत आहे. जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या आरंभी ही तरतुद लागू होईल व सार्वजनिक ठिकाणी लोकांना त्रस होईल अशा प्रकारे उघड्यावर दारू पिणे हा दखलपात्र गुन्हा ठरेल.

 मुख्यमंत्री म्हणाले, की विवाह सोहळा किंवा अन्य एखाद्या सोहळ्याप्रसंगी जर कुणी उघडय़ावर मद्य पित असेल तर तिथे कारवाई केली जाणार नाही. कारण अशा सोहळ्यांना परवानगी असते पण अन्यबाबतीत मात्र कारवाई होईल. पर्यटक आणि अन्य घटकांनी त्यासाठी सरकारला सहकार्य करावे. हॉटेलच्या खोल्यांमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये वगैरे बसून पर्यटकांनी मद्य प्यावे, पण उघड्यावर दारू पिण्याचे कृत्य करू नये. अबकारी कायद्यातील नव्या तरतुदीचे पालन करावे एवढी पर्यटकांकडून सरकारची अपेक्षा आहे. दारूच्या बाटल्या कुठेही फेकून देणे किंवा अन्य कचरा रस्त्याच्या बाजूने टाकताना कुणी पर्यटक किंवा स्थानिक आढळले तर लगेच कारवाई केली जाईल. टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेले पर्यटक दारूच्या दुकानां समोर आणि बीचवर दारू पिऊन बाटल्या तिकडचे टाकून जात असल्याचे आढळून आले होते.कळंगुट किनाऱ्यावर बियरच्या बाटल्या हातात घेऊन बीचवर जाणाऱ्या पर्यटकांना पोलिस रोखत असल्याचे चित्र पहायला मिळत होते.स्थानिक लोक देखील पुलांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून रिकाम्या बाटल्या तेथेच टाकून कचरा करत असल्याने कचरा उचलून साफ सफाई करण्याचे सरकारी यंत्रणेचे काम वाढले आहे.यापार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.