गोव्यात शुक्रवारपासून 3 दिवस लॉक डाउन

0
388
आज पासून रोज रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत जनता कर्फ्यू
गोवा खबर:गोव्यात कोविडचे रुग्ण आणि कोविडमुळे झालेल्या मृत्युंची संख्या वाढत असल्याची गंभीर दखल घेत सरकारने शुक्रवार पासून 3 दिवस लॉक डाउन जाहिर केले आहे.त्याच बरोबर आज पासून 10 ऑगस्ट पर्यंत रोज रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत जनता कर्फ्यू जाहिर केला आहे.याचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

 

मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.बैठकी नंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,कोविडचे रुग्ण आणि बळी वाढत असले तरी सरकारने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे.सध्या पाऊस जोरदार सुरु आहे.त्यामुळे पुढील पाच दिवस रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.गोव्यात कोविड चाचण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने रुग्ण वाढल्याचे चित्र दिसत आहे.आजही बरेच लोक मास्क न लावता,शारीरिक दूरी न राखता सगळीकडे फिरत आहे.कोरोनाला रोखण्यासाठी काही शिस्त पाळावी लागणार आहे.लोकांमध्ये जागृती करण्याचे पूरेपुर प्रयत्न सुरु असले तरी लोक त्याला दाद देत नाहीत.त्यामुळे लॉक डाउन आणि जनता कर्फ्यू जाहिर करावा लागत आहे.

शुक्रवारी 17 जुलै पासून रविवार 19 जुलै पर्यंत राज्यात पूर्णतः लॉक डाउन करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री सावंत म्हणाले या तीन दिवसात जीवनावश्यक सेवा सुरु असणार आहेत.त्यामुळे लॉक डाउन जाहिर झाले म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही.आज आणि उद्याचा दिवस मध्ये असल्याने चिंता करण्याची गरज नाही.
मुख्यमंत्री म्हणाले,याशिवाय आज पासून 10 ऑगस्ट पर्यंत रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.त्यावेळी  वीनाकारण कोणी बाहेर फिरताना आढळला तर त्याच्या विरोधात कडक कारवाई केली जाणार आहे.
लॉक डाउनच्या काळात पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार गोव्यात कोणी येत असतील तर त्यांना येऊ दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यात कोरोनामुळे 18 जणांचा मृत्यू झाला असला तरी त्यातील 17 जण अन्य गंभीर आजाराने आधीच ग्रस्त होते.एका रुग्णाने चार ते पाच दिवस ताप येत असून देखील उपचार घेतले नाहीत.जेव्हा श्वसनाचा त्रास सुरु झाला तेव्हा त्याने वैद्यकीय मदत घेतली,याकडे देखील मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.