गोव्यात शिवसेना स्वबळावर 25 जागा लढवणार : संजय राऊत

0
210
गोवा खबर : गोव्यात पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना स्वबळावर 25 जागा लढवणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली.
गोव्यात पुढील वर्षी मार्च महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत गोवा दौऱ्यावर असून त्यांनी काल आणि आज पक्षाच्या वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूक रणनीतीवर चर्चा केली.
पणजी येथील शिवसेना मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी गोव्यातील राजकीय परिस्थितीवर परखड मत व्यक्त करतानाच शिवसेना यावेळी स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती दिली.
राऊत म्हणाले, गेल्या वेळी आणि मगो आणि गोवा सुरक्षा मंच सोबत युती करून निवडणुका लढवल्या होत्या. युतीमध्ये फक्त 3 जागा आम्हाला मिळाल्या होत्या. युती झाली की मर्यादा येतात. त्यामुळे पक्ष विस्तार अपेक्षित वेगाने होत नसल्याने यावेळी आम्ही स्वबळावर 25 जागा लढवण्याचे ठरवले आहे. 10 ते 15 ठिकाणी आमचे उमेदवार ठरले असून इतर ठिकाण बाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
यावेळी शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत,गोवा संपर्क प्रमुख जीवन कामत,उपाध्यक्ष राखी नाईक, सरचिटणीस मिलिंद गावस, दक्षिण गोवा जिल्हा प्रमुख अलेक्सी फर्नांडिस उपस्थित होते.
युती वेळी आपली ताकद जास्त आहेत अस सांगुन ज्यानी जास्त जागा लढवल्या होत्या त्यांची अवस्था काय झाली होती, हे सगळे जाणून आहेत, याची आठवण करून देत राऊत म्हणाले, गोव्यातील जनता आमदारांच्या घोडेबाजाराला कंटाळली आहे. एका पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार स्वतःच्या स्वार्थासाठी एका रात्रीत पक्ष बदलून टाकतात. अशा आमदारांना लोकांनी रसत्यावर गाठुन ठोकले पाहिजे. शिवसेना असल्या गलिच्छ राजकारणाला थारा देणार नाही. गोव्यातील जनतेने आता पर्यंत इतर पक्षांना संधी देऊन पाहिले आहे. यावेळी शिवसेनेला संधी द्या. आम्ही चांगले सरकार निश्चित देऊ.
निष्क्रिय विरोधी पक्षांवर टिका करताना राऊत म्हणाले, गोव्यात सक्षम विरोधी पक्षाची कमतरता जाणवत आहे.गोव्यात लोकांचे अनेक प्रश्न असताना देखील विरोधी पक्ष मूग गिळून गप्प आहे. विरोधी पक्षातील आमदार आपण केव्हा सरकार मध्ये येतो याची स्वप्न बघत आहेत. ही चूकीची पद्धत असून ती आता थांबवण्याची गरज आहे. विरोधी पक्ष कमकुवत असल्याने सरकारची मनमानी सुरु आहे. सध्या गोव्यात सरकार आणि विरोधी पक्ष आहेत की नाही, अशी परिस्थिती आहे. हे चित्र बदलण्यासाठी गोव्याला शिवसेनेची गरज आहे.
निवडणुकीत विरोधी पक्षांची आघाडी होण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता राऊत म्हणाले, गोव्यातील विरोधी पक्षातले नेते मुंबई आणि दिल्लीमध्ये येऊन अनेकदा भेटत असतात. मात्र अद्याप तरी आघाडी किंवा महाआघाडी करून निवडणूक लढवण्याचा कोणाचाच प्रस्ताव नाही.
कॅसिनोमुळे गोव्याची ओळख बदलत आहे. गोव्यातील पर्यटन स्थळे,गोव्याची संस्कृती, गोव्यातील कला ही गोव्याची खरी ओळख आहे, असे सांगून राऊत म्हणाले, गोव्यातील कॅसिनोंमध्ये प्रचंड भ्रष्टाचार असून त्याची माहिती आपल्याकडे असून ही माहिती केंद्रीय यंत्रणांकडे देणार आहे. कॅसिनोमधिल भ्रष्टाचारामुळे गोव्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.गोव्याच्या बजेट पेक्षा देखील हा आकडा मोठा असून सरकार त्याकडे करत असलेले दुर्लक्ष गंभीर आहे. शिवसेना विधानसभेत गेल्या नंतर कॅसिनो उद्योगाला शिस्त लावेल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
प. बंगालमधील निवडणूकांसाठी शिवसेनेने ममता दीदीला पाठिंबा दिला असून आपण तेथे प्रचाराला जाणार असल्याची माहिती यावेळी राऊत यांनी दिली.