गोवा खबर:सलग सहाव्या दिवशीही गोव्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर उद्या बुधवारी 7 ऑगस्ट रोजी शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेला मुसळधार पाऊस कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही.संपूर्ण गोव्याला पावसाने झोडपून काढले आहे. पावसाचा सगळ्यात जास्त फटका डिचोली आणि सत्तरी तालुक्याला बसला आहे.साखळीत गेल्या 24 तासात 8 इंच तर वाळपई मध्ये 9 इंच पावसाची नोंद झाली आहे.
डिचोली आणि सत्तरी तालुक्यातील नद्यांना पुर आला असून काठावरील लोकांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काल सोमवारी रात्री बागवाडा-पीळगाव येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली होती.काल रात्री आणि आज सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आमोणा आणि साखळी येथील पुरग्रस्त भागाची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.साखळी बाजारपेठेत शिरलेले पाणी पंप लावून पुन्हा नदित सोडले जात आहे.
सत्तरी तालुक्यात अनेक रस्ते पण्याखाली गेल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे.विद्यार्थीच शाळेत पोचू न शकल्याने शाळांना सुट्टी देणे भाग पडले.उसगाव येथील नेस्ले कंपनी जवळ खांडेपार नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या 15 कुटुंबियांना अग्निशामक दलच्या जवानांनी बोटी मधून  बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले आहे.म्हापसा-गिरी येथे राष्ट्रीय महामार्ग पण्याखाली गेला होता.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मंदावली होती.मुख्यमंत्री प्रमोद सावंत पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.त्याच बरोबर आप्तकालीन यंत्रणा सज्ज असून अनेक ठिकाणी मदत कार्य सुरु करण्यात आले आहे.राजधानी पणजी मध्ये आजही झाडांची पडझड़ सुरुच होती.पुढील 3 दिवस असाच मुसळधार पाऊस होईल असा अंदाज पणजी वेधशाळेने वर्तवला आहे.
गोवा आणि बेळगाव जोडणाऱ्या चोर्ला घाटात दरड कोसळल्याने बेळगाव आणि गोवा यांच्यातील संपर्क तूटला आहे.भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू त्यामुळे गोव्यात पोचू शकल्या नाहीत. बाजारपेठेवर उद्या त्याचे परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
पुणे येथून बस मधून येणारे प्रवासी राधानगरी येथे अडकून  पडले आहेत.आज पहाटे पासून 12 बसेस मधून दीडशेहुन अधिक प्रवासी राधानगरी येथे अडकुन पडल्याचे समजताच मुख्यमंत्री कार्यालयाने त्याची दखल घेऊन त्यांना खाद्य आणि पाणी पुरवण्याची व्यवस्था केली.