गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा :विजय सरदेसाई यांची मागणी

0
284
गोव्यतील कुचकामी मंत्रीमंडळ कायमचे होम क्वारंटाईन करा
गोवा खबर:हे संपूर्ण वर्ष संपेपर्यंत गोव्यातील  सर्व विकासकामे बंद करण्याचा आणि नोकरभरती बंद करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने मुख्य सचिवांच्या दबावाखाली घेतला आहे. त्यामुळे  आमदार  व  मंत्र्यांना पुढच्या 14 महिन्यासाठी थेट होम क्वारंटाईन  होण्यासाठी पाठविले आहे ,अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली असून अशा कुचकामी मंत्रीमंडळाला सत्तेवर ठेवण्याऐवजी सर्व सरकारच बरखास्त करून गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि या सर्व आमदार मंत्र्यांना कायमचे होम क्वारंटाईन करावे, अशी मागणी केली आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीने राज्याला हे वर्ष संपेपर्यंत जणू ‘ होम क्वारंटाईन करून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.
मुख्य सचिवांनी हा निर्णय मंत्रीमंडळावर थोपला असल्याची विश्वसनीय सूत्राकडून आपल्याला माहिती मिळाली असल्याचा दावा करीत यामुळे सध्या राज्याचा कारभार राज्य कार्यकारी समितीच चालवीत असल्याचे स्पष्ट होते असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
अशा परिस्थितीत हे सरकार गोवेकरांना लुटण्याच्या नव्या योजना घेऊन पुढे येऊ शकते त्यामुळे गोवेकरांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. या सरकारातील बहुतेक मंत्री स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांतर करून आलेले आहेत. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत महसुलाचे नवीन श्रोत तयार करण्याची धमक नसलेले हे मंत्री लोकांना आता लुटण्यासाठी वेगळ्याच योजना घेऊन पुढे येऊ शकतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
जर राज्याचे प्रशासन राज्य कार्यकारी समिती चालवीत असेल तर एव्हढ्या मोठ्या मंत्रिमंडळाची गरजच काय असा सवाल करून त्यापेक्षा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून याच नोकरशाहीच्या बळावर राज्य चालविणे अधिक चांगले असेही त्यांनी म्हटले आहे.
गोव्यात येणारे खलाशी आणि इतर विदेशस्थ गोमंतकीय जर कोविड चाचणीत निगेटिव्ह ठरले तर त्यांना 14 दिवस घरात विलग होऊन राहता येईल असा जो निर्णय सरकारने घेतला आहे त्याचे स्वागत करताना गोयकारवादी शक्तींनी मुख्यमंत्र्यांवर सतत दबाव ठेवल्यामुळेच हे होऊ शकले असे त्यांनी म्हटले आहे.