गोव्यात या कोणत्याही चाचणी शिवाय

0
1025
गोवा खबर:22 मार्चच्या जनता कर्फ्यू नंतर सुरु झालेल्या लॉकडाउन आणि अनलॉक मध्ये पाच महीने गेल्या नंतर गोव्याच्या सीमा आता पूर्णपणे खुल्या करण्यात आल्या आहेत.जीवाचा गोवा करण्यासाठी येणार असाल तर आता कोणत्याही चाचणीशिवाय तुम्हाला गोव्यात प्रवेश मिळणार आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक 4.0ची मार्गदर्शक तत्व जारी करून त्याचे पालन करण्याचे निर्देश दिल्या नंतर गोवा सरकारने त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
गोव्यात प्रवेश करताना कोविड टेस्ट करून सक्तीचे होते.त्यामुळे सिंधुदुर्ग ,बेळगाव आणि कारवार मधून रोज गोव्यात नोकरी धंद्यासाठी येणाऱ्यांची ग़ैरसोय होत होती.कारवार सीमेवर दोन दिवसांपूर्वी तेथील लोकांनी आंदोलन करून मंगळवार पासून सीमा खुली केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार गोव्याच्या सीमा कोणत्याही निर्बंधाशिवाय उद्या पासून खुल्या होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
गोव्याच्या सीमा खुल्या होण्या बरोबरच महाराष्ट्र आणि कर्नाटकने देखील निर्बंध हटवल्याने गोव्यातील लोकही महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये बिनदिक्कत जा-ये करता येणार आहे.
गोव्यात अनलॉक मध्ये दारूची दुकाने आणि रेस्टोरेन्ट सुरु झाली होती,मात्र बारना परवानगी देण्यात आली नसल्याने बार मालक संघटना नाराज होती.मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन बार सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली होती.आता नव्या मार्गदर्शक तत्वां नुसार आवश्यक ती खबरदारी घेऊन उद्या पासून बार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.