गोव्यात मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या गैरहजेरीत पर्यायी नेतृत्वासाठी चाचपणी

0
1427
गोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या बिघडलेल्या प्रकृतीची दखल भाजपच्या हायकमांडने घेतली आहे.पर्रिकर आज रात्री अपचनाच्या त्रासामूळे अमेरिकेस रवाना होणार आहे.प्राथमिक अंदाजानुसार आठ दिवस त्यांचा मुक्काम अमेरिकेत असणार आहे.दरम्यानच्या काळात सरकारी कारभारावर परिणाम होऊ नये यासाठी पर्यायी नेतृत्व तयार करण्याबाबत भाजपमध्ये विचार विनिमय सुरु आहे.
प्रकृतीअस्वास्थ्यामुळे मुंबई येथे गेलेले  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनापुढील उपचारांसाठी अमेरिकेत नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रात्री एक वाजताते अमेरिकेला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यापार्श्वभूमीवर गोव्यात तात्पुरत्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरू झाली आहे. भाजपची कोअर कमिटी उद्या नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहे. आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.गोव्यात नेतृत्व समस्या उद्भवल्याने पक्षाला टीकेचा सामना करावा लागत असल्याच्या वृत्ताबाबत बोलताना  नाईक म्हणाले , या विषयी केंद्रातील नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. राज्याचे तात्पुरते नेतृत्व अन्य नेत्याकडे देण्याबाबत यावेळी चर्चा  होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  नाईक आजच दिल्लीला रवाना होणार आहेत.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, दक्षिण गोवा खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, सदानंद तानावडे व दत्ता खोलकर,माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आदी नेते मुंबईत दाखल झाले असून मुख्यमंत्री पर्रिकर यांची भेट घेऊन ही मंडळी पुढे नवी दिल्लीस रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.