गोव्यात मान्सूनची दमदार एन्ट्री

0
246
गोवा खबर:निसर्ग चक्रीवादळामुळे काहीसा विलंब झालेल्या मान्सूनने गोव्यात गुरुवारी रात्रीपासून जोरदार हजेरी लावली.  पहिल्याच दिवशी काल गुरुवारी राज्यात सुमारे 2 इंच पावसाची नोंद झाली. पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे.पावसामुळे गोवा हिरवागार झाला असून गोव्याचे सौंदर्य आणखीच खुलले आहे.
गोवा वेधशाळेने गोव्यात मान्सून पोहोचल्याचे काल दुपारी जाहीर केले. निसर्ग चक्रीवादळाने मान्सूनचे गोव्यातील आगमन लांबवले होते. मान्सून गेले काही दिवस कारवार जिह्यातच स्थिरावला होता.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटकमार्गे पाऊस गोव्यात पोहोचल्या नंतर  तो कारवारात  स्थिरावला होता.  राज्यात बुधवारी जोरदार पाऊस पडला होता मात्र मान्सूनच्या पहिल्याच दिवशी सकाळी जोरदार पाऊस झाला आणि दुपारनंतर तो गायब झाला होता.गुरुवारी रात्री सुरु झालेला पाऊस शुक्रवारी सकाळी देखील सुरुच आहे.
दरम्यान,हवामान खात्याने  14 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. हा पाऊस  ताशी 40 ते 50 कि. मी. वादळी वाऱ्यासह पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रातही जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आलेला आहे.
राजधानी पणजीत गुरुवारी सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या दरम्यान  12 मि. मी.पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासात एकूण 57.4 मि. मी.  पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासात राज्यात सर्वत्र जोरदार गडगडासह पाऊस पडला.