गोव्यात ब्रिटिश महिलेवर बलात्कार

0
1620
गोवा खबर:ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन हंगाम ऐन भरात असताना आज पहाटे दक्षिण गोव्यातील पाळोळे येथे 42 वर्षीय ब्रिटिश महिलेवर बलात्कार झाल्याने खळबळ उडाली आहे.
पाळोळे येथे राहणारी 42 वर्षीय ब्रिटिश महिला आज पहाटेच्या ट्रेनने उत्तर गोव्यातील थिवी येथे जाण्यासाठी चालत काणकोण रेल्वे स्टेशनवर आली होती.बराच वेळ वाट बघून ट्रेन न आल्याने ती पुन्हा चालत पाळोळे येथे जात असताना अज्ञाताने तिला वाटेत गाठले आणि शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्याकडील मौल्यवान वस्तू घेऊन तेथून पळ काढला.
त्या महिलेने याबाबत काणकोण पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली असून पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.
रेल्वेच्या सीसीटीव्ही फुटेजवरून संशयित बलात्कार व्यक्तीचं छायाचित्र सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पाळोळे पासून काणकोण रेल्वे स्टेशन दीड किलोमीटर अंतरावर आहे. याच पाळोळे जवळ दीड वर्षापूर्वी एका स्वीडनच्या महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात एका स्थानिकावर न्यायालयात खटला चालू आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, तपास करत आहेत.
ऐन पर्यटन हंगामात ही घटना घडल्याने पर्यटन उद्योगावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.