गोवाखबर:मुसळधार पावसाने राज्याला पुन्हा झोडपुन काढणे सुरु केले आहे. मंगळवारी रात्री सुरु झालेला पाऊस बुधवारी सायंकाळपर्यंत अखंडपणे चालू राहिला. पणजीत गेल्या 24 तासात 2 इंच तर बुधवारी सकाळी 8.30 ते सायं. 5.30 पर्यंत 3 इंच पाऊस झाला. यामुळे पणजीत पावसाची नोंद 61.29 इंच झाली. वाळपईत 72 इंच पाऊस आतापर्यंत झाला आहे. येत्या 4 दिवसात पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
जुलै महिन्यात पावसाचा जोर आणखीच वाढला आहे जुलैच्या पहिल्याच दोन दिवसात पावसाने अर्धशतक पूर्ण केले. बुधवारी पणजीत पावसाने 61 इंचापर्यंत मजल मारली. वार्षिक सरासरीच्या तुलनेत यावर्षी गोव्यात 335 मि.मी. म्हणजे तब्बल 13 इंच पाऊस अधिक पडलेला आहे.
यावर्षी 11 जुलै रोजी पावसाने 61 इंच पूर्ण केले.
पेडणे व वाळपई या दोन केंद्रावर सध्या पावसाचा जोर जास्त आहे. वाळपईत सर्वाधिक 72 इंच पावसाची नोंद बुधवारी सकाळी झाली, तर पेडणेमध्ये 69 इंच आतापर्यंत नोंद झाली आहे.
मडगावात आतापर्यंत सर्वात कमी 52 इंच पाऊस झालेला आहे. इतर ठिकाणी 55 ते 72 इंचापर्यंत मजल गाठलेली आहे.
साळावली धरण ओव्हरफ्लो

निसर्गप्रेमी दरवर्षी ज्याची मोठय़ा आतूरतेने वाट पाहतात तो साळावली धरणाचा जलाशय काल सायंकाळी 4.15 च्या सुमारास तुडुंब भरून वाहू लागला. धरण भरून वाहू लगताच अनेक पर्यटकांनी साळावलीच्या जलाशयाकडे धाव घेऊन या विहंगम दृष्याचा आनंद लुटला.
जेव्हा साळावलीच्या जलाशयातील पाणी 41.15 मीटरची पातळी पार करते तेव्हा जलाशय भरून वाहू लागतो. गेल्या काही दिवसांपासून सांगेच्या डोंगरमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी पंधरा दिवस अगोदरच जलाशय भरून वाहू लागला आहे. गेल्या वर्षी जलाशय 25 जुलै रोजी भरून वाहू लागला होता. धरणाच्या इतिहासात 11 जुलै इतक्या लवकर जलाशय भरून वाहण्याची ही पहिलीच खेप आहे, अशी माहिती जलस्रोत खात्यातील सूत्रांनी दिली.
