गोव्यात कोविडचे 191 नवीन रुग्ण; दोघांचा मृत्यू

0
597

गोवा खबर : गोव्यात आज कोविडचे नव्याने 191 रुग्ण सापडले. 166 रुग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी दिवसभरात कोविडमुळे दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 66 वर गेला आहे. राज्यात 2 हजार 95 कोविडग्रस्त विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. आज वास्को येथील दोघांचा मृत्यू झाल्यामुळे मुरगाव तालुक्यातील कोविडची दहशत आणखीच वाढली आहे.
राज्यात आतापर्यंत 7 हजार 614 कोविडचे रुग्ण आढळलेले आहेत. त्यातील 5 हजार 453 जण बरे झाले आहेत. 2 हजार 95 कोविडग्रस्त उपचार घेत असून आज झालेल्या दोघांच्या मृत्यूमुळे मृतांचा आकडा 66 झाला आहे. आज वास्कोमधील 67 आणि 73 वर्षीय इसमांचे कोविड हॉस्पिटलमध्ये निधन झाल्याने मुरगावातील कोविडची परिस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे.


राज्यभरात कोविडचा वेगाने प्रसार होऊ लागला आहे. उत्तर गोव्यातील आरोग्यकेंद्रनिहाय आकडेवारी पाहिली तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळीत 60, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या पेडणेत 37, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या वाळपईत 67, राजधानी पणजीत 78, कांदोळीत 57, कोलवाळेत 43, खोर्लीत 52, चिंबलमध्ये 120 तर पर्वरीत 48 रुग्ण उपचार घेत आहेत.
दक्षिण गोव्यात मुरगाव तालुक्याची हालत एकदम गंभीर बनली आहे. वास्को आरोग्य केंद्रांतर्गत 368 रुग्ण सापडले असून कुठ्ठाळीतील आकडा 284 वर गेला आहे. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणातील रुग्ण हे मुरगाव तालुक्यातील असून रुग्णांची संख्याही वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दक्षिण गोव्यात मडगावात 156, बाळ्ळीत 57, कासावलीत 37, कुडतरीत 54, लोटलीत 35, केपेत 40, शिरोड्यात 40, धारबांदोड्यात 31, फोंड्यात 108 तर नावेलीत 47 रुग्ण उपचार घेत आहेत.
गोव्यात रस्ता, विमान आणि रेल्वेमार्गे येणारे प्रवासीही कोविडग्रस्त आढळू लागले आहेत. आज अशा प्रकारचे 13 रुग्ण आढळल्यामुळे गोव्यातील कोविडग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.