गोव्यात कोरोनाच्या सावटामुळे 144 कलम लागू;पर्यटकांना गोव्यात येण्यास बंदी

0
547
गोवा खबर:कोरोना व्हायरसच्या सावटामुळे खबरदारी म्हणून कोणत्याही ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे.दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या पर्यटकांना गोव्यात प्रवेश दिला जाणार नसून त्याची अंमलबजावणी आज मध्यरात्री पासून होणार आहे.जीवनावश्यक वस्तूंच्या आतंरराज्य वाहतुकीवर कोणतीही बंदी असणार नाही,त्यामुळे लोकांनी चिंतीत होण्याची गरज नाही, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज स्पष्ट केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पहिल्यांदाच सुरु केलेल्या वेब आधारित अॅपच्या उद्धाटना नंतर पत्रकारांशी बोलताना राणे यांनी ही माहिती दिली.
राणे म्हणाले,कोरोना संदर्भात खबरदारी घेण्यासाठी आणखी कडक पावले उचलण्यात आली आहेत.राज्यात 144 कलम लागू झाल्यामुळे कोणत्याही ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांना जमता येणार नाही.आता कोणताही कार्यक्रम,सोहळा,उत्सव करता येणार नाही.कोरोना फैलावू नये म्हणून लोकांच्या हितासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
144 कलमा बरोबर आतंरराज्य वाहतूक थांबवली जाणार असल्याचे राणे म्हणाले.त्याबाबतचा आदेश निघाला असून आज मध्यरात्री पासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.गोव्या बाहेरील पर्यटक गोव्यात येऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
आतंरराज्य प्रवासी वाहतूक रोखली जाणार असली तरी जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करणारी वाहतूक मात्र सुरु असणार आहे,असे स्पष्ट करून राणे म्हणाले,जे गोमंतकीय कारने अत्यावश्यक कामासाठी गोव्याबाहेर येजा करणार आहेत त्यांची देखील तपासणी केली जाणार आहे.लोकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय कुठेच फिरू नये. सगळ्याची साथ मिळाली तर आपण आपले राज्य सुरक्षित राखू यात शंका नाही.
विमानतळावरील देशी पर्यटकांची देखील तपासणी सुरु झाली असल्याचे सांगून राणे म्हणाले,काही जण जहाजावर काम करून गोव्यात परतले असतील तर त्यांनी स्वेच्छेने आपली तपासणी करून घेतली तर ते सगळ्याच्या भल्याचे ठरणार आहे.कोणतीही शंका असल्यास चॅटबोट किंवा 104 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा.तेथे तज्ञ डॉक्टर नेमण्यात आले असून त्यांच्याकडून चांगले मार्गदर्शन केले जात आहे.शहनिशा न करता अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील राणे यांनी यावेळी दिला.
कोरोना रुग्णांसाठी 108 च्या खास 6 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या असून गोमेकॉ आणि सरकारी ईस्पितळांबरोबर गरज पडल्यास खाजगी हॉस्पिटल्स मध्ये देखील खाटांची व्यवस्था करण्याचे अधिकार आमच्याकडे असल्याची माहिती राणे यांनी यावेळी दिली.एका खाजगी रुग्णालयाने एका संशयित रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिल्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.त्या हॉस्पिटलला जिल्हाधिकाऱ्यां मार्फत कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असून असा प्रकार दुसऱ्यांदा घडल्यास त्या हॉस्पिटलचा परवाना रद्द केला जाणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
संयुक्त अरब अमिरात, अमेरिका येथून आलेल्यांनी सेल्फ क्वारंटाइन करून घ्यावे. तसेच कोरोना रुग्ण सापलेल्या प्रदेशातून कोणी प्रवास केला तर त्यांनी स्वत: सरकारी यंत्रणेला सांगून आवश्यक तपासणी करून खबरदारी घ्यावी, असे आवाहन करतानाच निकडीची गरज असेल तरच हॉस्पिटल्स मध्ये जावे,अशी सूचना राणे यांनी यावेळी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज,महाविद्यालये,थियेटर,मॉल, स्पा, आठवडा बाजार,कॅसिनो बंद करण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.24 मार्च रोजी उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींसाठी होऊ घातलेल्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.सगळी पर्यटन आणि धार्मिक स्थळे ओस पडली आहेत.पर्यटन उद्योगाचे कंबरडच कोरोनामुळे मोडून गेल आहे.