गोव्यात कोरोनाचे सात नवीन रुग्ण

0
236
गोवा खबर:ग्रीन झोन मध्ये असलेल्या गोव्यात कोरोनाचे सात नवीन रुग्ण सापडल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.

बुधवारी मुंबई मधून गोव्यात दाखल झालेली गोमंतकीय कुटुंबातील ५ सदस्य व चालकाचा यात समावेश आहे.या सहा जणांची काल रॅपीड टेस्ट करण्यात आली होती त्यात सगळ्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते.त्यानंतर गोवा मेडिकल कॉलेज मधील व्हायरॉलॉजी लॅब मध्ये त्यांची दुसरी टेस्ट करण्यात आली होती.त्यातही सर्व सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने लोकांमधील चिंता वाढली आहे.

दरम्यान, गुजरातहून सामान घेऊन आलेल्या एका ट्रकचालकाचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे गोव्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा सात झाली आहे.
 गोव्यात यापूर्वी सात कोरोना रुग्ण आढळून आले होते.त्यातील सहा जण हे विदेशातून आलेले गोमंतकीय होते.तर एक जण त्यापैकी एकाच्या संपर्कात आल्याने बाधित झाला होता.हे सर्व रुग्ण बरे होऊन घरी गेले असून त्यांची तब्बेत आता बरी आहे.
 3 एप्रिल नंतर गोव्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. तब्बल 40  दिवसांनी नवीन सात रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली असून लोकांची चिंता वाढली आहे.सर्व कोरोना रुग्णाना मडगाव मधील कोरोना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहेत.यापूर्वीचे सातही रुग्ण बरे करण्यात कोविड योध्याना यश असल्याने हे रुग्ण देखील बरे होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.नवीन रुग्ण कोणाच्याही संपर्कात आले नसल्याने तशी चिंता करण्याची गरज नाही अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
दरम्यान गोव्याच्या सीमा खोलू नये, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.सध्या ट्रेन सुरु होणार असून आतंरराज्य बसेस आणि विमानसेवा सुरु झाली तर गोव्याला असलेला धोका अधिक वाढेल,अशी चिंता लोक व्यक्त करु लागले आहेत.
गोव्यातून जाणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे.आतापर्यंत रस्ता आणि रेल्वे मार्गे जवळपास 21 हजार लोक गोव्यातून आपआपल्या गावी गेले आहेत.काल बुधवारी सायंकाळी मडगाव स्टेशन वरुन हिमाचल प्रदेश मधील उना येथे 1400 प्रवासी घेऊन चौथी श्रमिक ट्रेन निघाली आहे.यापूर्वी मध्यप्रदेश साठी एक तर जम्मू काश्मीरसाठी 2 श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.त्याच बरोबर रस्ता मार्गे जवळपास 2 हजार लोक गोव्यात दाखल झाले आहेत.