गोव्यात काँग्रेसचे 4 आमदार भाजपच्या वाटेवर:विनय तेंडुलकर यांचा दावा

0
1339
गोवा खबर: मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आजारपण बळावल्याने भाजपने आपले संख्याबळ वाढवून भाजप आघाडी सरकार भक्कम करण्याचे प्रयत्न चालवले आहेत.काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या वाटेवर आहेत.लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला खिंडार पडेल,असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने राज्यात राजकीय हालचाली बाढल्या आहेत.काल रात्री भाजपच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक पार पडली.त्यात मुख्यमंत्र्यांची तब्बेत चिंताजनक बनल्याने निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या विविध पर्यायांवर चर्चा झाली.बैठकीत दिगंबर कामत यांच्या भाजप प्रवेशावर देखील चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दिगंबर कामत आज सकाळीच दिल्लीस रवाना झाल्याचे कळताच कामत यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगू लागली होती.त्यात तेंडुलकर यांनी केलेल्या दाव्यामुळे गोव्यात लोकसभा निवडणुकी पूर्वी राजकीय उलथा पालथ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दिगंबर कामत यांनी आपण वैयक्तिक कामासाठी दिल्लीस जात आहे.राजकीय कारण काही नाही.भाजप प्रवेशाच्या अफवांमध्ये तथ्य नाही.4 दिवसां पूर्वी मी दिल्लीस गेलो होतो.आज देखील नेहमी प्रमाणे दिल्लीस जात असून सायंकाळी परत येणार असल्याचे कामत यांनी स्पष्ट केले आहे.
दिगंबर कामत यांच्या गटातील आणि त्या बाहेरील आणखी एक आमदार भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा,तेंडुलकर यांनी केल्यामुळे काँग्रेसच्या गोटात देखील हलचल निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची तब्बेत शनिवारी जास्त बिघडली होती.मात्र आता ती स्थिर असल्याचा दावा भाजपच्या सगळ्या नेत्यांकडून केला जात आहे.मगो नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिलेल्या माहिती नुसार मुख्यमंत्री ऑक्सिजनवर असून त्याला रिकव्हर व्हायला वेळ लागणार आहे.
गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी आपल्या पक्षाच्या 3 आणि 3 अपक्ष आमदारां सोबत काल सायंकाळी मुख्यमंत्री पर्रिकर यांची भेट घेऊन आपण सर्व तुमच्या सोबत आहोत असा विश्वास व्यक्त केला होता.आज सकाळी मगोचे तिन्ही आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले.आपली ही भेट कौटुंबिक होती त्यात राजकीय हेतू नव्हता असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे.